नाशिक – शेअर बाजारातील गुंतवणुकीवर जादा परताव्याचे अमिष दाखवत सायबर भामट्यांनी एका निवृत्त अधिकार्याला ९२ लाखांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.
या बाबत गोविंदनगर भागात राहणाऱ्या ६७ वर्षीय निवृत्त अधिकाऱ्याने तक्रार दिली. तक्रारदार हे काही वर्षांपूर्वी वीज कंपनीतून निवृत्त झालेले आहेत. गेल्या एप्रिल महिन्यात सायबर भामट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. टी फोर फायर्स व्हिज्डम क्लब नावाच्या व्हॉटसॲप गटात या अधिकार्याला समाविष्ट करण्यात आले. या गटात शेअर बाजारातील गुंतवणूक विषयी चर्चा होत असे. सदस्यांकडून मोठा परतावा मिळाल्याचा दावा करण्यात येत असल्याने अधिकार्याने संभाषणात सहभाग नोंदवल्याने संशयीतांनी त्यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधला.
व्हॉटसअप कॉलवरून संपर्क साधत संशयीतांनी त्यांना पाठविलेल्या लिंक च्या माध्यमातून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. तीन महिन्यात या अधिकाऱ्याने ९२ लाख दोन हजार ४४७ रूपयांची गुंतवणूक केली. मात्र कुठलाही परतावा वा गुंतवणुकीची रक्कम परत मिळाली नाही. संबंधित अधिकाऱ्याने संशयितांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होऊ शकला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पादचारी वृद्धेचे दागिने लंपास
हेल्मेट परिधान केलेले पोलीस असल्याची बतावणी करीत एकाने पादचारी ७० वर्षीय वृध्देला रोखून पावणे चार लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील गुरुगोविंद सिंग महाविद्यालय परिसरात घडली. या बाबत कमल भदाणे (७०, श्याम मार्बलजवळ, सराफनगर) यांनी तक्रार दिली.
भदाणे या वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील ब्रम्हकुमारी केंद्रात शिबिरासाठी गेल्या होत्या. संशयितांनी आवाज देऊन त्यांना थांबविले. रस्त्याच्या बाजूला उभे असलेले हेल्मेटधारी पोलीस असल्याची माहिती देत हातचलाखीने दागिने लंपास केले. संशयिताने मदतीच्या बहाण्याने सुमारे तीन लाख ७० हजार रूपये किंमतीचे दागिने लंपास केले. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्लास्टिक बंदी कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण
पखाल रस्ता भागात प्लास्टिक बंदी कारवाईवेळी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. या बाबत विजय मारू (५६, आरटीओसमोर, पेठरोड) यांनी तक्रार दिली. जाहिद वली मोहम्मद शेख (पखालरोड) व त्याचे दोन ते तीन साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीतांची नावे असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. मारू हे महापालिकेचे कर्मचारी असून ते पखाल रस्ता भागात प्लास्टिक बंदीची कारवाई करीत होते.
भाजी बाजारात पिकअप चालक ग्राहकांना कांदे, बटाटे ग्राहकांना प्लास्टिक पिशवीत देतांना आढळला. मारू यांनी जाब विचारला असता संतप्त विक्रेत्याने आपल्या साथीदारांना बोलावून घेत वाद घातला. संशयित टोळक्याने मारू यांना बेदम मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरट्यांकडून तांदूळ, वेफर्सची चोरी
हनुमानवाडी भागात गोदाम फोडून चोरट्यांनी तांदळाचे कट्टे व वेफर्सचे खोके लंपास केले. या बाबत सोनाली हरकुट (गणेशनगर, मखमलाबादरोड) यांनी तक्रार दिली. किराणा मालाचे व्यापारी असलेल्या हरकुट यांचे हनुमान वाडीतील जगझाप मार्गावर गोदाम आहे. मध्यरात्री चोरट्यांनी गोदामाच्या मागील भागातील पत्रा उचकटून तांदळाचे १३ कट्टे व बटाटा वेफर्सचे खोके असा सुमारे २८ हजार ४७० रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.
या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.