धुळे : शहरातील जिल्हा रुग्णालयाच्या आवारातून मोटारसायकलींची चोरी करणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून चार लाख ९० हजार रुपयांच्या १३ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या. या कारवाईमुळे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या नऊ गुन्ह्यांची उकल झाली.
धुळे जिल्ह्यातून चोरीस गेलेल्या मोटारसायकलींचा शोध घेवून कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी विशेष पथक स्थापन करून माहिती मिळवली. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तांत्रिक विश्लेषणानंतर पोलिसांनी धुळे शहरातील वडजाईरोडवर असलेल्या व्हीआयपी लॉन्सजवळून सलमान सय्यद (२६, रा.शंभर फुटी रोड, जामचा मळा, धुळे), मोटारसायकल रिपेअरिंग कारागीर अकीब उर्फ बाबा शेख जैनोद्दीन (३६, रा.चिराग गल्ली, नंदुरबार) आणि वसीम शेख (३०, रा.काली मशीद जवळ,नंदुरबार) यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी लपवून ठेवलेल्या आणि वापरात असलेल्या १३ मोटारसायकली पोलिसांना काढून दिल्या. या मोटारसायकलींची किंमत चार लाख ९० हजार रुपये आहे. या मोटारसायकली वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या नऊ गुन्ह्यांतील असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
धुळे जिल्ह्यातील मुंबई- आग्रा महामार्गावर शहराला लागूनच असलेल्या लळींग (ता. धुळे) किल्याच्या पायथ्याशी पर्यटकांनी उभ्या केलेल्या मोटार सायकली चोरण्यात येतात. याशिवाय भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयाच्या आवारातूनही मोटारसायकलींची चोरी होते. शहरातील मुख्य बाजारपेठेतूनही मोटारसायकलींची चोरी झाली आहे. अटकेत असलेल्या संशयितांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, प्रकाश पाटील, पोलीस अंमलदार संजय पाटील, हेमंत बोरसे, मच्छिंद्र पाटील, योगेश चव्हाण व प्रल्हाद वाघ यांनी ही कामगिरी केली