धुळे : येथील रेल्वे स्थानकात नऊ कोटी ४९ लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे लोकार्पण २२ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात येणार असल्याची माहिती धुळे रेल्वे स्थानकाचे प्रबंधक सुरेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

धुळे रेल्वे स्थानकाच्या विविध विकास कामांना २०२३ मध्ये सुरुवात झाली होती. ऑगस्ट २०२४ मध्ये जवळपास सर्वच कामे पूर्ण झाली. या कामांसाठी रेल्वे विभागाकडून नऊ कोटी ४९ लाख रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या कामांमध्ये अधिकाऱ्यांच्या दालनांचे नूतनीकरण, स्थानक प्रबंधक कार्यालय, महिला आणि पुरुष तसेच अपंगांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह, फलाटसाठी नवीन छत अशा कामांचा समावेश आहे.

याशिवाय बाहेरील संपूर्ण भागात नवीन टाइल्स लावण्यात आली आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता फलाट भाग वाढविण्यात आला आहे. स्थानकालगत उद्यान, विद्युत झुंबर, विद्युत रोषणाई अशी कामे करण्यात आली आहेत. रेल्वे इंडिकेटर बसविण्यात आले असून भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. पाचोरा- जामनेर मिनी रेल्वे बोगीचा वापर करून आगळीवेगळी तिकीट विक्री व्यवस्था करण्यात आली आहे.

या कामांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते २२ मे रोजी सकाळी नऊ ते १० या वेळेत ऑनलाईन पद्धतीने होईल. यावेळी आजी-माजी आमदार, खासदार, तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्यासह निमंत्रित मान्यवर उपस्थित राहणार आहेत.