नाशिक – क. का. वाघ शिक्षण संस्था, क. का. वाघ फाऊंडेशन, बाळासाहेब वाघ वेल्फेअर फाऊंडेशन, स्माईल आणि स्पीनच सेंटर यांच्यावतीने आयोजित पर्यावरणस्नेही गणेशा अर्थात शाडू मातीपासून गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेत तब्बल २८०० विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होत गणपती बाप्पाच्या सुबक मूर्ती साकारल्या.
मुंबई-आग्रा महामार्गालगतच्या वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर इको फ्रेंडली गणेशा अर्थात शाडू मातीपासून गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सकाळपासून मैदानावर विद्यार्थी व पालकांची मोठी गर्दी जमली. ललित कला महाविद्यालयातील तज्ज्ञ मूर्तीकारांनी मार्गदर्शन केल्यानंतर खऱ्या अर्थाने मूर्ती निर्मितीला सुरुवात झाली. शाडू मातीला आकार देत विद्यार्थ्यांनी सुबक मूर्ती साकारल्या.
कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक ग्रामीणचे पोलीस अधिक्षक आदित्य मिरखेलकर तर, अध्यक्षस्थानी संस्थेच्या विश्वस्त शकुंतलाताई वाघ होत्या. यावेळी संस्थेचे जनसंपर्क संचालक अजिंक्य वाघ, प्राचार्य डॉ. के.एन. नांदुरकर, प्राचार्य पी. टी. कडवे, प्राचार्य डॉ. के. एस. साळुंखे यांच्यासह विविध महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते. ‘इको फ्रेंडली गणेशा’ कार्यशाळेत शहरी भागासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत, शाडू मातीपासून सुबक, सुरेख व देखण्या गणेशमूर्ती साकारल्या. पर्यावरणस्नेही गणेश मूर्ती ही आजची गरज असल्याचे मिरखेलकर यांनी नमूद केले.
दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत असून बाजारात गणेश मूर्ती निर्मितीत प्लास्टर ऑफ पॅरिसचा अधिक्याने वापर केला जातो. गणेशोत्सव पर्यावरणस्नेही पद्धतीने साजरा व्हावा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शाडू मातीच्या गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी या हेतून हा उपक्रम राबविला जात असल्याचे मनोगतात अजिंक्य वाघ यांनी सांगितले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन सारंग नाईक व योगेश गायधनी यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ, सचिव प्रा. के. एस. बंदी यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी प्राचार्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

साकारलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
पर्यावरण संवर्धन या जाणिवेतून संस्थतर्फे दरवर्षी शाडूमाती कार्यशाळेचे आयोजन केले जाते. यंदा या उपक्रमात इयत्ता पहिली ते चौथी, पाचवी ते दहावी, कनिष्ठ- वरिष्ठ महाविद्यालयातील २८०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. यातील बहुतांश विद्यार्थी त्यांनी साकारलेली शाडू मातीच्या गणेश मूर्तीची घरी प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.