धुळे : पुण्यातील एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात अशी घोषणा दिल्याने त्याचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. मनसे, ठाकरे गटासह सर्वच विरोधकांकडून शिंदे यांच्यावर सडकून टीका होत असताना एकनाथ शिंदे यांनी काय वक्तव्य केले, हे आपणास ठावूक नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी धुळे येथे व्यक्त केली.

स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूक तयारीसंदर्भात धुळे येथे आयोजित अजित पवार गटाच्या मेळाव्यासाठी तटकरे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिंदे हे शिवसेनेचे सर्वेसर्वा आहेत. त्यांनी काय बोलावे, हा त्यांचा अधिकार आहे, असे तटकरे यांनी सांगितले. निवडणूक पूर्वतयारी आणि उत्तर महाराष्ट्रापासून पक्ष मजबुतीची ही सुरुवात आहे. कार्यकर्त्यांमध्ये अभूतपूर्व उत्साह आहे. पक्ष नोंदणीचा आढावा दौऱ्यात घेतला जात आहे.समन्वय समितीच्या बैठकीत निर्णय झाल्यानुसार दौऱ्याची रूपरेषा ठरली. भाजप संधीसाधू पक्ष नसून राष्ट्रवादीला त्या पक्षाकडून नेहमीच सन्मापूर्वक वागणूक दिली गेली आहे. जवळपास आठ वर्षांनी स्थानिक पातळीवर निवडणूक होत आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्याही अधिक असून यामुळे युतीला बाधा येणार नाही याची आम्ही काळजी घेऊ.आम्हाला एकमेकांची मदत मिळणार नाही हे मत चुकीचे ठरले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युती, आघाडीची निवडणुकीत अपरिहार्यता आहे. विधानसभा निवडणूक निकाल पाहता प्रमुख विरोधक दिसत नाहीत. तरीही पूर्ण ताकदीनेच आपण निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. प्रवेश झालेले नवे आणि जुने असे सर्व एकत्र येऊन काम करतील, यासाठीच खरेतर हा दौरा आहे. कोणाचा दबाव कोणावरही नाही, अशी आजची परिस्थिती आहे. बलात्कार प्रकरणाच्या संदर्भात विकृत मनोवृत्ती ठेचून काढली पाहिजे, असे मत तटकरे यांनी व्यक्त केले.यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. फटाक्यांची आतषबाजी आणि जयघोषात तटकरे यांचे स्वागत करण्यात आले.