नाशिक – शेअर बाजारातील गुंतवणुकीवर भरघोस नफ्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील दोन जणांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. याबरोबरच गोल्डन अवर सायबर मदत संकल्पनेतून टेलीग्राम टास्क फ्रॉडची नऊ लाख ८० हजाराची रक्कम मूळ मालकास परत मिळवून देण्यास सायबर शाखेस यश आले.

प्रमोद गुळे (रा.टूनकीरोड, शिऊर, ता.वैजापूर, जि.छत्रपती संभाजीनगर) आणि नयन वाघचौरे (रा.प्रतापगड नगर, छत्रपती संभाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत मालेगाव येथील गुंतवणूदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, संशयितानी तक्रारदारास शेअर बाजारातील गुंतवणुकीवर भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते.

अनोळखी नंबरवरून संपर्क साधत तक्रारदारास शेअर बाजारात कशाप्रकारे गुंतवणूक करायची, याबाबत माहिती देण्यात आली. व्हॉटसअप ग्रुपमध्ये समावेश करुन त्यांना लिंक पाठविण्यात आली. या लिंकच्या माध्यमातून संशयितांनी गुंतवणूक करण्यास भाग पाडले. तब्बल ३० लाख ५८ हजार ९१६ रुपयांची गुंतवणूक केली असतांना तक्रारदाराच्या बँक खात्यात ९५ लाख नऊ हजार २५८ रूपये जमा असल्याचे दिसले. गुंतवणूकदाराने रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता फसवणुकीचा प्रकार उघड झाला.

सायबर भामट्यांनी नफ्याच्या रकमेवर २० टक्के रक्कम आयकर भरण्यासाठी आमच्याकडे जमा करा, असा सल्ला दिल्याने तक्रारदाराने बँकेत जावून चौकशी केली असता फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तक्रारदाराने तत्काळ ग्रामीण पोलिसांच्या सायबर शाखेत तक्रार केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर विभागाचे निरीक्षक नागेश मोहिते, उपनिरीक्षक दिगंबर थोरात, हवालदार प्रमोद जाधव, पोलीस नाईक परिक्षीत निकम, अंमलदार तुषार खालकर,सुनील धोक्रट, विशाल चौधरी, हवालदार हेमंत गिलबिले व प्रदिप बहिरम आदींच्या पथकाने दोघांना छत्रपती संभाजीनगर येथे बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून तीन लाख रुपये तक्रारदारास मिळवून दिले.

व्यापाऱ्यास ऑनलाईन गंडा

दुसऱ्या एका प्रकरणात पिपळगाव बसवंत येथील भावेश धाडीवाल या व्यापाऱ्यास सायबर भामट्यांनी १० जुलै रोजी टेलीग्रामवरील एका ग्रुपमध्ये सामील करुन उत्पादनाची प्रसिध्दी केल्यास पैसे मिळतील, असे आमिष दाखविले होते. या प्रकरणात धाडीवाल यांना तब्बल १६ लाख ७८ हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात भरण्यास भाग पाडण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच धाडीवाल यांनी ग्रामीण पोलीसांच्या सायबर शाखेत धाव घेतली. पोलिसांनी ऑनलाईन तक्रार दाखल करून घेत तक्रारदाराचे नऊ लाख ८० हजार रुपये वाचविण्यात यश आले.