नाशिक: बागलाण तालुक्यातील तळवाडे येथील शेतकरी बापू गायकवाड यांनी १२ एकर क्षेत्रावर हंगामपूर्व द्राक्षाचा बहार धरला होता. लाखो रुपयांचे भांडवल खर्च करून अपार मेहनत घेत त्यांनी उत्कृष्ट द्राक्ष उत्पादित केले होते. हा सर्व माल व्यापाऱ्याने ११० रुपये प्रति किलो दराने खरेदी केला होता. सौदा पक्का झाल्यानंतर व्यापारी माल काढण्यासाठी येण्याच्या एक दिवस अगोदरच झालेल्या अवकाळी पावसात क्षणार्थात सर्व होत्याचे नव्हते झाले. ही व्यथा मांडताना गायकवाड अक्षरशः धाय मोकलून रडले.

अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ७० हजारहून अधिक शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे. कुणाची तयार झालेली तसेच होणारी द्राक्ष खराब झाली तर कुणाचा काढणीवर आलेला कांदा डोळ्यांसमोर हातातून गेला. भात पिकाचे वेगळे काही झाले नाही. तयार भाताची केवळ काढणी करायची होती. तत्पुर्वीच पावसाने तो भुईसपाट केला. जिल्ह्यात सुमारे ३५ हजार हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले. यात सर्वाधिक प्रमाण द्राक्ष, कांदा, भात पिकासह भाजीपाल्याचे आहे. सरकारी पातळीवर पंचनामे होतील. काहीअंशी मदतही मिळेल. पण, नैसर्गिक आपत्तीतील नुकसान भरून निघणार नसल्याची भावना उमटत आहे. बागलाण तालुक्यात झालेल्या नुकसानीची आमदार दिलीप बोरसे यांनी पाहणी केली. गायकवाड यांच्यावर ओढावलेल्या कठीण प्रसंगाने सारे गहिवरले.

हेही वाचा… छापील वीज देयकास ४० हजार ग्राहकांचा नकार; पर्यावरणस्नेही मार्गाचा अवलंब

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बागलाण तालुक्यात दोन दिवसात अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्याने शेती पिकांची मोठी हानी झाली. निर्यातक्षम द्राक्ष मातीमोल झाले. हंगामपूर्ण द्राक्षांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे कोट्यवधी्चे नुकसान झाले. यासोबत लाल कांदा, उन्हाळी कांदा रोपे,काढून ठेवलेला मका, डाळिंब व अन्य फळ पिके तसेच वेगवेगळ्या भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. या संकटाने शेतकरी हतबल झाला आहे. तालुक्यातील नळकस, कुपखेडा, सारदे, तळवाडे (भामेर), वाघळे, श्रीपुरवडे, आखतवाडे, बिजोटे, निताने, पारनेर, करंजाड यासह ठिकठिकाणी शेतशिवारात जाऊन आमदार बोरसे यांनी शेतकऱ्यांचे दुःख जाणून घेतले. बाधित शेतकऱ्यांना धीर देत शासन स्तरावरून भरीव नुकसान भरपाई मिळवून देण्याबाबत आश्वासित केले. यावेळी विक्रम देवरे, दादाजी देवरे, भाऊसाहेब अहिरे, हिम्मत वाघ आदींसह अन्य शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन बोरसे यांनी संवाद साधला. यावेळी बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे, कृषी अधिकारी भोये, तालुका सहायक निबंधक जितेंद्र शेळके उपस्थित होते.