scorecardresearch

Grampanchayat election : उत्तर महाराष्ट्रात भाजप, राष्ट्रवादीला बळ, शिंदे गटाचीही मुसंडी 

उत्तर महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात भाजपचे चारही जिल्ह्यांत वाढणारे बळ अधोरेखित झाले आहे.

Grampanchayat election : उत्तर महाराष्ट्रात भाजप, राष्ट्रवादीला बळ, शिंदे गटाचीही मुसंडी 

नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात भाजपचे चारही जिल्ह्यांत वाढणारे बळ अधोरेखित झाले आहे. शिंदे गटानेही आश्चर्यकारक मुसंडी मारली आहे. विरोधकांमध्ये राष्ट्रवादीने ग्रामीण भागातील आपली पाळेमुळे अधिक मजबूत केली असली तरी यापुढे भाजप-शिंदे गटाला रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट यांना महाविकास आघाडी म्हणूनच सामोरे जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे या निकालांनी दाखवून दिले आहे.

ग्रामपंचायत निवडणुका पक्षीय चिन्हावर लढविल्या जात नसल्याने प्रत्येक पक्षाकडून सर्वाधिक जागा मिळविल्याचे दावे केले जातात.  नाशिक जिल्ह्यातील १९६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस समर्थकांनी सरपंचपदाच्या सर्वाधिक ६३ जागा जिंकून ग्रामीण भागात आपला वरचष्मा कायम राखला. त्या खालोखाल भाजप समर्थकांनी ५५ जागांवर विजय मिळवत ग्रामीण भागात बळ वाढविले. ठाकरे गटाला २८ तर, शिंदे गटाला २२ जागा मिळाल्या. काँग्रेस पुन्हा एकदा तळाला राहिली. त्यांना केवळ सात जागा मिळाल्या. राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे, छगन भुजबळ यांना त्यांच्या मतदारसंघांमध्ये धक्का बसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अर्थात राष्ट्रवादीच्या या तीनही आमदारांच्या क्षेत्रात त्यांना भाजप किंवा शिंदे गटाकडून नव्हे तर, शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून धक्का बसला आहे. बनकर यांच्या गावात पिंपळगाव बसवंतमध्ये ठाकरे गटाचे भास्करराव बनकर यांनी बाजी मारली. कोकाटे यांच्या सिन्नर मतदारसंघातही ठाकरे गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या समर्थकांनी वर्चस्व राखले. छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातही ठाकरे गटाने आपली ताकद दाखवली असून भुजबळ यांनीही राष्ट्रवादीनेच अधिक जागा मिळविल्याचा दावा केला आहे.

भाजपने देवळा, चांदवड मतदारसंघात तर, राष्ट्रवादीने बागलाण, कळवणमध्ये आपला प्रभाव कायम राखला. शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे, पालकमंत्री दादा भुसे यांनीही नांदगाव, मालेगाव बाह्य या आपल्या मतदारसंघांमध्ये सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा केला आहे. एकूणच बंडखोरीनंतरही ठाकरे गट जिल्ह्यात अजूनही बऱ्यापैकी टिकून असल्याचे दिसून येते.

जळगाव जिल्ह्यात भाजप आणि शिंदे गटाकडून वर्चस्वाचा दावा करण्यात आला आहे. दूध संघात पराभव पत्करावा लागल्यानंतर राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांचे राजकारण संपल्याची हाकाटी पिटण्यात आली. परंतु, मुक्ताईनगर या आपल्या बालेकिल्ल्यातील ताकद खडसे यांनी कायम राखल्याचे ग्रामपंचायत निवडणूक निकालातून दिसून आले. दूध संघात खडसे यांच्या पत्नीचा पराभव करणारे भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी मुक्ताईनगरात काही ठिकाणी प्रचार सभा घेतल्या होत्या. परंतु, खडसे यांचा प्रभाव कायम राहिला. शिंदे गटातील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे वर्चस्वही टिकून आहे. धुळे जिल्ह्यात भाजप अधिकाधिक मजबूत होत असून धुळे तालुका वगळता इतरत्र विरोधकांच्या हाती फारसे काही लागले नाही. शिरपूर तालुक्यातील सर्व जागा भाजप समर्थकांनी मिळविल्याने  आमदार अमरीश पटेल यांची ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाली. नंदुरबार जिल्ह्यात सर्वच पक्षांनी आपणास अधिक जागा मिळाल्याचा दावा केल्याने नेमकी राजकीय परिस्थिती समजणे अवघड झाले आहे.

या निकालांनी प्रत्येक पक्षाला आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांना पुढील रणनीतीत काय बदल करावा लागेल, हे दाखवून दिले आहे. ठाकरे गटाला धुळे, जळगाव जिल्ह्यात अधिक काम करावे लागणार आहे. काँग्रेसला केवळ धुळे तालुक्याने साथ दिली आहे. राष्ट्रवादीला नाशिक आणि काही प्रमाणात जळगाव जिल्ह्याने साथ दिली आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-12-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या