पावसामुळे द्राक्षबागांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी बागलाण (सटाणा) तालुक्यात १५ ते २० शेतकऱ्यांनी ६० एकर क्षेत्रावर लाखो रुपये खर्चून प्लास्टिक कागद आच्छादनाच्या केलेल्या प्रयोगाचे सकारात्मक फलित समोर आले आहे. आच्छादित पूर्वहंगामी द्राक्षांची गुणवत्ता खुल्या आकाशाखालील द्राक्षांपेक्षा चांगली राहिली. त्यावर कुठलेही डाग पडले नाहीत. रोगराईचा देखील प्रादुर्भाव झाला नाही. त्यामुळे त्यांना प्रति किलो ३० ते ४० रुपये अधिक म्हणजे ११५ रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा- नाशिक: प्रवास न करताही टोल वसुली; शिंदे नाक्यावरील प्रकाराने नाहक भुर्दंड

अवकाळी, वादळी पावसाने मागील काही वर्षांपासून द्राक्ष शेतीचे समीकरण विस्कटत आहे. त्यातही हंगामपूर्व द्राक्ष उत्पादन घेणाऱ्या कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या कसमादे भागात पावसाचे सदैव सावट असते. कारण, येथील बागांची छाटणी इतर भागांच्या तुलनेत लवकर म्हणजे जुलै, ऑगस्टमध्ये केली जाते. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये द्राक्ष काढणीस येतात. छाटणीनंतर मुसळधार पावसाने कुज, डावणीचा प्रादुर्भाव, द्राक्षघड डागाळणे वा तत्सम प्रकार घडतात. द्राक्ष बागांच्या संरक्षणासाठी बागलाणमधील १५ ते २० शेतकऱ्यांनी आपल्या बागा सरसकट प्लास्टिक आच्छादित करण्याचा प्रयोग प्रत्यक्षात आणला. अतिशय खर्चिक असा हा प्रयोग आहे. सुमारे ६० एकर क्षेत्रावरील बागेत तो करण्यात आला. त्यासाठी एकरी साडेतीन ते चार लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे शेतकरी सांगतात. नवीन द्राक्षबाग लागवडीसाठी येणाऱ्या खर्चाच्या व्यतिरिक्त हा खर्च आहे. द्राक्षबागांसाठी शेतात उभारलेल्या नेहमीच्या रचनेपेक्षा उंच लोखंडी सळई (ॲगल), तारांच्या सहाय्याने स्वतंत्र व्यवस्था केली गेली. या तारांवर प्लास्टिक कागद टाकला जातो. बागांमध्ये ही व्यवस्था टोपीसारख्या आकारात दिसते. त्यामुळे द्राक्ष वेलींवर पाणी पडत नाही. पाऊस झालाच तर पाणी दोन सरींमध्ये पडते. या व्यवस्थेमुळे उत्तम दर्जाची द्राक्षे हाती आल्याचे या प्रयोगासाठी पुढाकार घेणारे द्राक्ष बागाईतदार संघाचे संचालक भारत सोनवणे यांनी नमूद केले.

हेही वाचा- नाशिक-सिन्नर महामार्गावर बस-दुचाकीच्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू; बसही जाळून खाक

द्राक्षांना दर्जानुसार दर

या उपक्रमात सोनवणे यांच्यासह दीपक गुंजाळ, भरत गुंजाळ, संजय सूर्यवंशी (तिळवण), अनिल खैरनार (बोडवेल), अनिल भामरे, प्रवीण सूर्यवंशी आदी शेतकरी सहभागी झाले आहेत. डोंगरेज, विरगाव फाटा येथेही हे प्रयोग झाले. मध्यंतरी द्राक्ष बागायईतदार संघाच्या नाशिक विभागाचे अध्यक्ष रवींद्र निमसे आणि पदाधिकाऱ्यांनी सटाणा येथे भेट देऊन प्रयोगाची उपयुक्तता जाणून घेतली होती. आता पूर्वहंगामी द्राक्षे बाजारात दाखल झाली असून आच्छादनाखालील द्राक्षे आणि खुल्या क्षेत्रातील द्राक्षांना दर्जानुसार वेगवेगळा दर मिळत आहे.

खुल्या क्षेत्रातील द्राक्षांवर डाग

पावसाच्या फेऱ्यात सापडलेल्या खुल्या क्षेत्रातील द्राक्षांवर डाग पडले. रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकची औषधे फवारावी लागली. आच्छादित द्राक्षांना तसा कुठलाही धोका नव्हता. औषधे आणि फवारणीचा खर्च बराच कमी झाला. डागविरहित असल्याने या द्राक्षांकडे ग्राहकही आकर्षित होतात. त्यामुळे आच्छादित द्राक्षांना ११० ते ११५ रुपये प्रति किलोनुसार दर मिळतो, असे शेतकरी सांगतात. तर खुल्या क्षेत्रातील द्राक्षांना ६० ते ८० रुपये किलोचा भाव मिळत आहे. चांगल्या प्रतीची द्राक्षे रशिया आणि दुबईत निर्यात होत आहेत.

हेही वाचा- “शरद पवारांनी दत्त उपासना करावी, ४८ तासांचा अल्टिमेटम देऊन…”, सीमाप्रश्नावरून महंतांचा सल्ला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पावसामुळे नुकसान होत असल्याने काहीतरी वेगळे करायला हवे, म्हणून बागांवर आच्छादनाचा प्रयोग करण्यात आला. बागेच्या नियमित रचनेव्यतिरिक्त नवी व्यवस्था करण्यावर मोठा खर्च करावा लागला. मात्र, त्याचे फायदे दृष्टीपथास आले आहेत. छाटणीनंतर बागांवर हे आच्छादन टाकले गेले. नंतर पेस्टिंगचे काम झाले. बागांना आवश्यकतेनुसार सूर्यप्रकाशही मिळाला. पावसात खुल्या क्षेत्रातील द्राक्ष बागांचे नुकसान झाले. त्या द्राक्षांवर डाग पडले. तुलनेत आच्छादित बागा सुरक्षित राहिल्या. किडीचा प्रार्दुभाव कमी झाला. फवारणी व औषधांचा खर्च निम्म्याने वाचला. पक्षांचा त्रासही थांबला. आच्छादनासाठीचा हा कागद पाच वर्षे वापरता येतो, अशी माहिती पुण्याच्या द्राक्ष बागाईतदार संघाचे संचालक भारत सोनवणे यांनी दिली.