लोकसत्ता वार्ताहर
धुळे: जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खनन, वाहतूक आणि साठवणूक प्रकरणी महसूल विभागामार्फत जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत वाहन मालकांकडून दोन कोटी तीन लाखाचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिली.
जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत अवैध गौणखनिज उत्खनन, वाहतूक व साठवणूक करत असतांना वाळूचे १७१, मुरुमाचे ३४, मातीचे पाच, दगडांची १२ याप्रमाणे एकूण २२२ वाहने पकडण्यात आली. दंड न भरलेल्या सात वाहनांचा तहसील कार्यालयामार्फत लिलाव करुन त्यातून दंडाची रक्कम सात लाख चार हजार ७४० वसूल करुन ती शासन जमा करण्यात आली आहे. अवैध गौणखनिज वाहतूक करत असताना पकडलेल्या वाहन मालकांनी दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ केली असता सदर वाहन मालकाच्या मालमत्तेवर बोजा चढविण्यात आला आहे. पकडलेली वाहने अवैधरित्या पळवून नेल्याचे निदर्शनास आल्यानंतर अशा वाहनचालक, धारकांविरूध्द विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा-लाच प्रकरणी धुळे जिल्ह्यात खासगी व्यक्तीला अटक
जिल्ह्यात प्रत्येक तहसी कार्यालय अंतर्गत २४ तास पथके कार्यरत असून जिल्ह्याच्या मुख्यालयी देखील जिल्हास्तरीय भरारी पथक कार्यान्वीत केली आहेत. पथकातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर चार वेळा हल्ले झाले असून हल्लेखोरांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महसूल, पोलीस आणि प्रादेशिक ‘परिवहन विभाग यांचेमार्फत अवैध गौणखनिज वाहतूक रोखण्यासाठी संयुक्त कारवाई करण्यात येत आहे. नवीन वाळू धोरण २०२३ अंतर्गत धुळे जिल्ह्यात शासकीय वाळू आगार निर्माण करण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहितीही जिल्हाधिकारी गोयल यांनी दिली.