नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात शेती व्यवसाय उद्ध्वस्त झाला असताना दुसरीकडे निसर्ग कोपला आहे. यामुळे शेतकरी वर्गात अस्वस्थता असताना या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री कांदा व इतर कृषिमालाच्या दराविषयी मूग गिळून बसल्याचा आरोप करत भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना लक्ष्य केले. देवळा भूमी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी कांदा निर्यात शुल्काच्या प्रश्नावर आपण दिंडोरीचे खासदार असतांना गळ्यात कांद्याच्या माळा घालून संसदेत आंदोलन केले होते व केंद्र सरकारला निर्यात शुल्क शून्य करण्यास भाग पाडले होते, याकडे लक्ष वेधले.
दुर्देवाने यावेळी तसे झाले नसल्याची जाणीव करून दिली. मालेगाव लोकसभा आणि नंतर दिंडोरी लोकसभा मतदारसंघ असे या भागाचे तीनवेळा चव्हाण यांनी लोकसभेत प्रतिनिधीत्व केले होते. मागील वेळी भाजपने त्यांना संधी दिली नाही. त्यांच्या ऐवजी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी डॉ. भारती पवार यांना रिंगणात उतरवले. विजयी होताच केंद्रात त्या राज्यमंत्री बनल्या. लोकसभा निवडणुकीपासून नाराज असणाऱ्या चव्हाण यांनी मतदारसंघातील कांदा व शेतीच्या संबंधित विषयांवरून पक्षाच्या राज्यमंत्री तथा खासदार डॉ. पवार यांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याचे अधोरेखीत झाले आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने चव्हाण यांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याचे चित्र आहे.
देवळा येथील कार्यक्रमात चव्हाण यांनी शेतकऱ्यांना कृषी उत्पादक कंपनीमार्फत नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध होत असल्याने ती काळाची गरज असल्याचे नमूद केले. आज शेतकऱ्यांना विविध संकटाना सामोरे जावे लागत असून, जिल्ह्यातील शेतकरी कष्टाळू व प्रयोगशील आहेत .शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यात उत्पादक हब झाल्यास त्याचा निश्चितच फायदा होईल. या कंपन्यांना शेतकऱ्यांनी प्रोत्साहन दिले पाहिजे. मागील काळात व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे लुबाडले होते, ते मी परत करायला भाग पाडले .असेही चव्हाण यांनी सांगितले