नाशिक : महायुतीची प्रचार फेरी शालिमार भागातील शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यालयासमोरून जात असताना कार्यकर्त्यांनी मशाल पेटवून ‘५० खोके, सबकुछ ओके’, ‘आवाज कुणाचा…’ अशा घोषणा देत शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा निषेध केला. नाशिक मतदारसंघात निष्ठावंत विरुद्ध गद्दार अशी लढाई असल्याकडे संबंधितांनी लक्ष वेधले. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेऊन तणाव निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेतली. या मुद्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाकडे कुठलेही काम राहिले नसल्याचे टिकास्त्र सोडले.

शिवसेना दुभंगल्यापासून स्थानिक पातळीवर शिंदे गट आणि ठाकरे गटात संघर्ष सुरू आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात याच दोन्ही पक्षांमध्ये थेट लढत होत आहे. महायुतीच्यावतीने शिवसेना (शिंदे गट) उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीतून भाजप उमेदवार डॉ. भारती पवार यांनी गुरुवारी शक्तिप्रदर्शन करुन अर्ज दाखल केले. त्यासाठी बी. डी. भालेकर मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी फेरी काढण्यात आली. फेरीत महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित होते.

हेही वाचा…इगतपुरीतील काही वाड्या, पाड्यांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा

प्रचार फेरीच्या मार्गावर शिवसेना ठाकरे गटाचे कार्यालय आहे. या कार्यालयासमोर या पक्षाचे चिन्ह असलेली पेटती मशाल ठेवली गेली होती. ठाकरे गटाचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कुठलाही तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. महायुतीची फेरी मार्गस्थ होत असताना ठाकरे गटाकडून शिंदे गटाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. लोकसभेची ही निवडणूक म्हणजे निष्ठावंत विरुध्द गद्दार अशी लढाई आहे. गद्दारांना नागरिक मतदानातून धडा शिकवतील. जे गोडसे शिवसेना, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले नाहीत, ते लोकांचे काय होणार, असा प्रश्न ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.

प्रचार फेरीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र नव्हते. ज्यांनी घडवले, त्यांना हे विसरले. पंतप्रधान मोदींचे छायाचित्र लावण्याची यांच्यावर वेळ आल्याचा आरोप करण्यात आला. शिंदे गटाच्या अहंकाराला भस्मसात करण्यासाठी मशाल पेटविण्यात आल्याचे संबंधितांकडून सांगितले जात होते.

हेही वाचा…नाशिक : फेरीसाठी गर्दी जमविताना राजकीय मंडळींची दमछाक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टोमणे मारणे एवढेच काम – मुख्यमंत्र्यांचे टिकास्त्र

प्रचार फेरीवेळी मशाल पेटविल्याबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे गटाकडे शिव्याशाप, डिवचणे, टोमणे मारणे याशिवाय काही काम राहिले नसल्याचा टोला हाणला. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांना काहीच काम राहणार नाही. टोमणे, डिवचणे यांच्यात त्यांचे आयुष्य गेले. ते अजूनही सरकार बदलले, सत्ता बदलली, हे मानायला तयार नाही, त्यांच्या पचनी पडत नाही, असे टीका त्यांनी केली.