जळगाव – मध्य रेल्वेतर्फे प्रवाशांच्या सोयीसाठी दिवाळी तसेच छठ पुजेच्या काळातील वाढती गर्दी लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) आणि नागपूर दरम्यान अतिरिक्त वातानुकूलित सुपरफास्ट विशेष गाडी चालविण्यात येणार आहे. या गाडीला जिल्ह्यात जळगाव तसेच भुसावळ स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

दिवाळी आणि छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना घरी सुखरूप पोहोचता यावे, यासाठी मध्य रेल्वेने तब्बल १,७०२ विशेष गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. या गाड्या मुंबईसह इतर प्रमुख स्थानकांमधून सुटतील आणि उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल तसेच ईशान्येकडील राज्यांकडे धावतील. प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त तिकीट खिडक्या, होल्डिंग एरिया आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच, प्रवासाबाबत दिशाभूल करणाऱ्या चित्रफिती किंवा अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा मध्य रेल्वे प्रशासनाने दिला आहे. दिवाळी आणि छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या १,७०२ विशेष गाड्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस तसेच पुणे, कोल्हापूर आणि नागपूर यांसारख्या प्रमुख स्थानकांमधून सुटतील.

यापैकी ८०० पेक्षा अधिक गाड्या या थेट उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांकडे रवाना होतील. तसेच देशातील इतर अनेक ठिकाणी देखील या विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून रेल्वेने अधिक सुविधा आणि व्यवस्थापन मजबूत करण्यावर भर दिला आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे १२०० चौरस मीटर क्षेत्रफळाचे होल्डिंग क्षेत्र तयार करण्यात आले आहे. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस येथे १० हजार चौरस मीटर, पुणे स्थानकावर दोन हजार चौरस मीटर, नाशिक रोड स्थानकावर एक हजार चौरस मीटर आणि नागपूर स्थानकावर १५०० चौरस मीटर क्षेत्रफळाचे होल्डिंग क्षेत्र तयार करण्यात आले आहे. सर्व होल्डिंग क्षेत्रांमध्ये एकावेळी सुमारे २० हजार प्रवाशांना थांबण्याची सोय उपलब्ध आहे. छप्पर असलेले शेड, पुरेसा प्रकाश, वायुवीजन, पिण्याचे पाणी, पंखे, शौचालये, चार्जिंग पॉइंट्स, खाद्यपदार्थांची दुकाने आणि प्रवाशांसाठी घोषणा प्रणालीची सोय त्याठिकाणी केली आहे. गाड्यांच्या वेळापत्रकासह इतर महत्त्वाची माहिती नियमितपणे जाहीर केली जात आहे.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वातानुकूलित विशेष गाडी क्रमांक ०१००५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शनिवारी पहाटे ००.२० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी दुपारी ०३.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१००६ वातानुकूलित सुपरफास्ट विशेष गाडी नागपूर येथून शनिवारी सायंकाळी ०६.१० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०८.२५ वाजता पोहोचेल. या गाडीला दोन्ही बाजुने २० वातानुकूलित तृतीय श्रेणी डब्यांसह दोन जनरेटर व्हॅन जोडल्या जातील. विशेष गाड्यांचे आरक्षण सर्व संगणकीकृत केंद्रांवर तसेच संकेतस्थळावर करता येणार आहे.