जळगाव – जिल्हा प्रशासनाने गेल्या आठवड्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा अंतिम अहवाल नाशिक विभागीय आयुक्तांकडे सादर केला आहे. त्यानुसार, एकूण ७७ गावांतील १४ हजारांहून अधिक शेतकरी नैसर्गिक आपत्तीने बाधित होऊन ११ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे.
दरम्यान, अतिवृष्टीग्रस्त भागात तत्काळ मदत व बचाव कार्य सुरू करून बाधित नागरिकांना तात्पुरता निवारा उपलब्ध करून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे विस्कळीत झालेले जनजीवन आता पूर्वपदावर आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनाने आपत्तीग्रस्त भागातील नुकसानीचा अंतिम प्राथमिक अहवाल तयार करून तो बुधवारी नाशिक येथील विभागीय आयुक्तांकडे सादर केला. या अहवालानुसार ११ हजार ३७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान होऊन तब्बल १४ हजार ४० शेतकरी बाधित झाल्याचे दिसून आले आहे. पैकी कपाशीचे सर्वाधिक ६९०३ हेक्टरचे नुकसान झाले आहे. याशिवाय, केळीचे १०३९ हेक्टर, मक्याचे १७७३ हेक्टर, सोयाबीनचे २३७ हेक्टर आणि इतर पिकांचे ५४० हेक्टरचे नुकसान झाले झाले आहे.
अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या ३५ जवानांचे पथक बाधित भागात पाठवले होते. त्यांनी दोन दिवसांत शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून दिली. ई-पंचनामे ॲपच्या माध्यमातून कृषी व महसूल विभागाकडून नुकसान झालेली पिके आणि जनावरांचे बहुतांश पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. उर्वरित पंचनामे आता अंतिम टप्प्यात आहेत.
आपत्तीग्रस्त भागांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे तसेच आमदार चंद्रकांत पाटील, आमदार किशोर पाटील आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही बाधित गावांना भेटी दिल्या.
तिघांचा वाहुन गेल्याने मृत्यू
अतिवृष्टीने निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे जिल्ह्यात एकूण तीन जणांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आहे. पैकी मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा येथील किरण सावळे या तरूणाचा पुराच्या पाण्यात वाहुन गेल्याने मृत्यू झाला होता. सावळे कुटुंबियांना पालकमंत्री पाटील आणि मंत्री सावकारे यांच्या उपस्थितीत चार लाख रूपयांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला.
या व्यतिरिक्त भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील लक्ष्मण ठाकरे (३०), पाचोरा तालुक्यातील खाजोळा येथील आबा पिंगळे (३५) आणि वडगाव टेक येथील नीता भालेराव (१४) या मुलीचा नदीच्या पाण्यात वाहुन गेल्याने मृत्यू झाला आहे. तिघांच्या कुटुंबियांना शासन नियमाप्रमाणे आर्थिक मदतीची प्रतीक्षा आहे.