जळगाव – हनी ट्रॅपसह पुणे रेव्ह पार्टी प्रकरणावरून जिल्ह्याचे राजकारण तापले असताना, मंत्री गिरीश महाजन आणि आमदार एकनाथ खडसे यांच्यातील शाब्दिक युद्धाने विखारी वळण घेतले आहे. या पार्श्वभूमीवर, जळगावमधील लोकप्रतिनिधींचे विकासाकडे लक्ष कमी आणि दुसऱ्या गोष्टींकडे जास्त असल्याची खंत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी येथे व्यक्त केली. एकीकडे सासरे आणि दुसरीकडे पक्षाचे नेते असताना दोघांना त्यांनी घरचा आहेर दिला.

हनी ट्रॅप प्रकरणातील संशयित प्रफुल्ल लोढा याच्याशी असलेल्या संबंधाच्या आरोपावरून मंत्री गिरीश महाजन आणि आमदार एकनाथ खडसे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक चकमकी झडत होत्या. लोढा याच्याकडे असलेल्या एका सीडीत महाजन यांच्याशी संबंधित वादग्रस्त माहिती दडल्याचा दावा करुन ती मिळाल्यावर बरेच काही घडले असते, असे खळबळजनक विधान खडसे यांनी केले होते. याशिवाय, साध्या शिक्षकाचा मुलगा इतका करोडपती कसा झाला म्हणून त्यांनी प्रश्न उपस्थित केला.

दुसरीकडे, मंत्री महाजन यांनीही निखील खडसे आत्महत्या प्रकरणावर संशय व्यक्त करून खडसे यांना डिवचले. तशात भाजप आमदारांनी जळगावमधील पत्रकार परिषदेत आगपाखड करून खडसे-महाजन वादात आणखी रॉकेल ओतले.

दरम्यान, पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई आणि शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांचे नाव पुढे आले. त्यावरून मंत्री गिरीश महाजन यांनी आयती संधी साधत पुन्हा खडसे यांना लक्ष्य केले. दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला कलगीतुरा लक्षात घेता जिल्ह्यातील नागरिकांची चांगलीच करमणूक झाली. राज्यसभेचे नवनियुक्त खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांनी त्यास थेट राजकीय दहशतवाद संबोधले.

त्यानंतर आता केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सध्या जळगाव जिल्ह्यात जे काही सुरू आहे, ते कुठेतरी थांबले पाहिजे. त्याविषयी मनाला खूप वेदना होतात, असे म्हटले आहे. जळगावमध्ये शुक्रवारी रानभाजी महोत्सवाला भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

जळगावमधील राजकीय वादाविषयी मी थेट प्रतिक्रिया देऊ शकत नाही. कारण, मी केंद्रातील जबाबदार मंत्री आहे. जोपर्यंत काही तथ्य बाहेर येत नाही तोपर्यंत त्याविषयी प्रतिक्रिया देणे मला योग्य पण वाटत नाही. मात्र, जिल्ह्याची लोकप्रतिनिधी म्हणून माझी प्रामाणिक इच्छा आहे, की कोणीही नेता असो त्याने विकासावर आधी भर दिला पाहिजे. जिल्ह्याचे राजकारण कशा पद्धतीने आणि कोणत्या दिशेला चालले आहे, हे सर्वजण पाहत आहेत. विकासाचे अनेक मुद्दे आहेत. त्यातल्या त्यात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणे जास्त गरजेचे आहे. त्याकडे सर्व लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यायला पाहिजे, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री खडसे यांनी व्यक्त केली.