नाशिक : राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची शिक्षण संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी ॲड. नितीन ठाकरे आणि आ. माणिक कोकाटे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलने जोरदार शक्तिप्रदर्शन केल्यानंतर बुधवारी नीलिमा पवार आणि माणिकराव बोरस्ते यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ प्रगती पॅनलने तोच मार्ग अनुसरत इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल केले. विधानसभा, लोकसभा निवडणुकीचे अर्ज दाखल करण्यासाठी राजकीय पक्ष जसे शक्तिप्रदर्शन करतात, त्याचे प्रत्यंतर या निवडणुकीत येत आहे. या वर्षी सत्तारूढ प्रगती आणि विरोधी परिवर्तन (जुने नाव समाज विकास) या दोन्ही पारंपरिक पॅनलमध्ये लढत होणार आहे. भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी प्रगती पॅनलचे समर्थन केल्याने विरोधी पॅनलला धक्का बसला आहे.

मंगळवारी ॲड. ठाकरे आणि आमदार कोकाटे यांच्या नेतृत्वाखालील मविप्र परिवर्तन पॅनलने इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल केले होते. या वेळी काही उमेदवारांकडे संस्थेचे माजी पदाधिकारी दिवंगत माजी मंत्री डॉ. डी. एस. आहेर यांच्या प्रतिमा असणारे फलक होते. संस्थेतील पवार गटाविरोधात डॉ. आहेर यांचा गट राहिलेला आहे. या वेळी पॅनलचे समाज विकास हे नावही इच्छुक उमेदवारांच्या आग्रहास्तव बदलण्यात आले. अर्ज दाखल केल्यानंतर धनदाई लॉन्स येथे मेळावा पार पाडला. या वेळी सत्तारूढ गटाच्या बेबंदशाही कारभारावर टीकास्त्र सोडण्यात आले. विरोधी पॅनलच्या आरोपांना बुधवारी सत्तारूढ पॅनलकडून प्रत्युत्तर देण्यात आले. मविप्रच्या निवडणुकीसाठी बुधवारी प्रगती पॅनेलच्या वतीने इच्छुक उमेदवारांनी सुश्रुत रुग्णालयापासून मिरवणुकीद्वारे संस्था कार्यालयात अर्ज दाखल केले. त्यानंतर श्रद्धा लॉन्स येथे झालेल्या सभासद संवाद मेळाव्यात अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, नीलिमा पवार, माणिकराव बोरस्ते, रामचंद्रबापू पाटील, सुरेशबाबा पाटील, आ. राहुल ढिकले, आ. राहुल आहेर, माजी आमदार मारोतराव पवार आदी उपस्थित होते. पवार यांनी मागील १२ वर्षांत संस्थेच्या झालेल्या प्रगतीचा आलेख मांडला. आपल्या कारकीर्दीत १३७ शाखांमध्ये वाढ केली असून ३०० एकर जमीन खरेदी, त्याचप्रमाणे ४०० कोटींची बांधकामे करण्यात आल्याचे सांगितले. श्रीराम शेटे यांच्या भूमिकेविषयी तर्कवितर्क करण्यात येत असताना त्यांनी मेळाव्यात सहभागी होत संस्थेच्या विकासासाठी आपण प्रगती पॅनलसोबत असल्याचे नमूद केले. आ. राहुल आहेर यांनी संस्थेला नीलिमाताई यांच्या भक्कम नेतृत्वाची गरज असल्याचे सांगितले. आ. ढिकले यांनी विरोधकांच्या भूलथापांना सभासदांनी बळी पडू नये, असे आवाहन केले.

अर्ज दाखल करण्यास वेग
बुधवापर्यंत ६५९ अर्जाची विक्री झाली. उमेदवारी स्वीकारण्याची ११ ऑगस्ट ही अंतिम मुदत आहे. त्यामुळे अन्य इच्छुकांची गुरुवारी गर्दी होण्याची शक्यता आहे. संस्थेत सरचिटणीस हे प्रभावशाली पद आहे. त्यासाठी अॅड. नितीन ठाकरे, नीलिमा पवार, राजेंद्र डोखळे, भरत शिंदे, वसंतराव पवार अशा पाच तर अध्यक्षपदासाठी तुषार शेवाळे, आ. कोकाटे, केदा आहेर, दिलीप मोरे, बाळासाहेब क्षीरसागर, सुरेश वडघुले अशा ११ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. उपाध्यक्ष पदासाठी २२, सभापती पदासाठी ११, उपसभापती पदासाठी १८ अर्ज दाखल झाले आहेत.