नाशिक – सरकारने काही अपवाद वगळता जेईई आणि नीट परीक्षांची तयारी करण्याची काहीही व्यवस्था केलेली नसल्याने विद्यार्थी महाविद्यालय सोडून पूर्ण दिवस खासगी शिकवणी वर्गात घालवतात. यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होतेच, शिवाय पालकांचे, सरकारी अनुदानाचे प्रचंड नुकसान होत आहे. या पद्धतीला सरकारचे धोरण कारणीभूत असल्याची तक्रार कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या बैठकीत करण्यात आली. राज्यातील संलग्न अर्थात टाय अप महाविद्यालय-क्लासेसबाबत योग्य धोरण निश्चित करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

जेईई आणि नीट परिक्षांची काठिण्य पातळी वाढविणे, पण त्याच्या मार्गदर्शनाची सुविधा महाविद्यालयांमध्ये न करणे या प्रमुख कारणाने, अकरावी व बारावीच्या महाविद्यालय- क्लासेस संलग्न अर्थात टायअपची निवड पालकांकडून होते. त्याचा दृश्य परिणाम म्हणजे राज्यातील नामांकित महाविद्यालयात प्रवेश नाही. जिथे अकरावीच्या १० तुकड्या असत, तिथे तीन तुकड्यांइतकेसुद्धा विद्यार्थी नाहीत. त्यामुळे संस्थाचालक, प्राचार्य आणि संबंधित शिक्षक वैतागले आहेत. दुसरीकडे खेड्यातील महाविद्यालय प्रवेश स्वतःकडे दाखवून ते शहरातील कॉर्पोरेट तसेच इतर कोचिंग क्लासेसला विद्यार्थी पाठवतात. क्लासचे संचालक, उत्तीर्ण करण्याचे व ज्यादा गुण मिळवून देण्याची खोटी आश्वासने देतात. याबद्दल बाधित झालेल्या महाविद्यालय, क्लासेस संचालक व विद्यार्थी संघटनांची संयुक्त बैठक शनिवारी शिंगाडा तलाव येथील कार्यालयात झाली. यावेळी क्लासेस संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी मार्गदर्शन केले.

या पद्धतीला सरकारचे धोरण कारणीभूत असल्याचा सूर बैठकीत उमटला. अधिकारी, मंत्री दुर्लक्ष करत असल्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच साकडे घालून यावर योग्य ते धोरण ठरवावे आणि योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्याावर एकमत झाले. तसे निवेदन मुख्यमंत्र्यांना ईमेलद्वारे पाठवण्यात आले. लवकरच प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन चर्चा करुन, योग्य ती पावले उचलावेत, यासाठी आग्रह धरला जाणार आहे. यावेळी टाय अप क्लासेसचे प्रतिनिधी अतुल पुराणिक, प्रदीप येवला, अशोक देशपांडे, प्रवीण गडाख, कैलास खताळे, लोकेश पारख, विजय खाडे, नीलेश दूसे आदी संचालक उपस्थित होते.

नामांकित महाविद्यालयात प्रवेशाची भ्रांत

महाराष्ट्र शासनातर्फे अनेक कनिष्ठ महाविद्यालयांना कोट्यवधी रुपयांचे अनुदान दिले जाते. परंतु अलीकडच्या काही वर्षांत, अकरावी, बारावी विज्ञानचे अनेक अनुदानित तसेच अर्ध विनाअनुदानित व सरकारी परवानगी घेऊन सुरु झालेली विनाअनुदानित महाविद्यालयांनी बाहेर खासगी कोचिंग क्लासेसशी टायअप केलेले आहे. यामध्ये विद्यार्थी केवळ कॉलेजला नाममात्र प्रयोगशाळेत प्रशिक्षणासाठी जातात व बाकी सर्व अध्यापनासाठी कोचिंग क्लासेसवर अवलंबून राहतात. त्यामुळे अनेक नामांकित महाविद्यालयात प्रवेश होत नाही व तेथील अनुदानित शिक्षक रिकामे राहत असल्याकडे कोचिंग क्लासेस संचालक संघटनेने लक्ष वेधले आहे.