मालेगाव : भरती प्रक्रियेत पारदर्शकता यावी तसेच गैरप्रकार टाळावेत या उद्देशाने शासनातर्फे ‘पवित्र पोर्टल’चे प्रयोजन करण्यात आले असले तरी शिक्षक भरतीच्या नावाने राज्यात फसवणुकीचे प्रकार घडतच आहेत. ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून मुलाला शिक्षक पदाची नोकरी मिळवून देण्याची थाप मारुन देवळा तालुक्यातील महालपाटणे येथील शेतकऱ्यास असाच गंडा घालण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

एकुलता एक मुलगा शिक्षक होईल आणि आपल्या कुटुंबाला सुखाचे दिवस येतील,या अपेक्षेमुळे हा शेतकरी भुलला. त्यासाठी चक्क शेतजमीन विक्री करण्याचा धाडसी निर्णय अंमलात आणून जमविलेले १८ लाख रुपये नोकरीसाठी दिले. परंतु काही कालावधीच्या प्रतीक्षेनंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तेल गेलं आणि तूपही गेलं, अशी अवस्था या शेतकऱ्याची झाली. याप्रकरणी शिक्षकी पेशातील दुकलीच्या विरोधात सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तू बोरसे असे या प्रकरणातील तक्रारदार शेतकऱ्याचे नाव आहे. बोरसे यांचा मुलगा मोहन हा एम.ए.बी.एड.असून माध्यमिक शिक्षकाच्या नोकरीसाठी त्याचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, बागलाण तालुक्यातील आराई येथील नातेवाईकाच्या घरी बोरसे यांची संशयित कुंदन देवरे (सटाणा) याच्याशी भेट झाली. या भेटीत धनंजय कापडणीस (द्याने,सटाणा) नावाचे आपले एक नातेवाईक मंत्रालयात उच्चपदस्थ अधिकारी आहेत व त्यांच्यामार्फत मोहन यास अनुदानित शाळेत शिक्षकाची नोकरी लावून देतो, असे आमिष देवरे याने दाखविले. त्या बोलण्यावर विश्वास ठेवून बोरसे यांनी १८ जून २०२२ रोजी देवरे यास साडेआठ लाख रुपये रोख स्वरूपात दिले.

तसेच त्यानंतर अडीच-तीन महिन्यांच्या कालावधीत देवरे याच्या पत्नीच्या दोन वेगवेगळ्या बँक खात्यांत भरणा केलेले साडेसात लाख व त्याच्या स्वतःच्या बँक खात्यात भरणा केलेले दोन लाख रुपये असे एकूण १८ लाख रुपये दिले गेले. परंतु सांगितल्याप्रमाणे बरीच प्रतीक्षा करूनही मुलाला नोकरी मिळत नसल्याचे स्पष्ट झाल्याने आपली फसवणूक झाल्याची खात्री बोरसे यांना पटली. त्यानंतर पैसे परत मिळण्यासाठी देवरे याच्या मागे त्यांनी लकडा लावला, परंतु तो उडवाउडवीची उत्तर देत राहिला.

बराच पिच्छा पुरविल्यावर धनंजय कापडणीस व कुंदन देवरे या दोघांनी पैसे परत देण्याचे कबूल करत अनुक्रमे दहा लाख व पाच लाख रुपये एवढ्या रकमांचे धनादेश बोरसे यांना दिले. तसेच देवरे याने फोन पे वरून ५ लाख ४६ हजार रुपये बोरसे यांना हस्तांतरित केले. तसेच मुलगा मोहन याच्या बँक खात्यात कापडणीस याने दीड लाख रुपये हस्तांतरित केले. अशाप्रकारे नोकरीसाठी दिलेल्या १८ लाख रकमेपैकी ६ लाख ९६ हजार रुपये परत प्राप्त झाले तरी ११ लाख ४ हजार रुपये येणे बाकी असल्याने बोरसे यांनी १५ लाख रकमेचे दोन्ही धनादेश बँकेत भरले.

मात्र उभयतांच्या खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नसल्याने हे धनादेश वटू शकले नाहीत. यानंतर बोरसे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. त्यानंतर चक्रे फिरली व सटाणा पोलीस ठाण्यात देवरे व कापडणीस या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

संशयीत देवरे हा जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक असून कापडणीस हा आदिवासी विभागाच्या आश्रम शाळेत शिक्षक असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. महालपाटणे शिवारात बोरसे यांच्या मालकीची दीड एकर शेतजमीन होती. शेती व्यवसायावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. परंतु मुलाला नोकरीसाठी पैसे देता यावेत म्हणून त्यातील एक एकर शेतजमीन त्यांनी घाईगडबडीत विक्री करुन टाकली.

आता त्यांच्याकडे केवळ अर्धा एकर शेती शिल्लक राहिली आहे. या एवढ्याशा जागेत रहाते घर देखील अस्तित्वात आहे. त्यामुळे शेती गेली, मुलाला नोकरीही मिळाली नाही आणि संपूर्ण पैसेही परत न मिळाल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, हा बिकट प्रश्न त्यांच्यासमोर आता उभा ठाकला आहे.