मालेगाव : वेगात धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळ बसच्या चालकाने स्वतःच्या सीटवर अचानक मान टेकवली अन् नियंत्रण सुटलेली ही बस रस्त्याच्या कडेला उलटण्याचा थरार प्रवाशांनी अनुभवला. राष्ट्रीय महामार्गावरील उमराणे गावाजवळ बुधवारी हा अपघात घडला. सुदैवाने जीवित हानी टळली असली तरी २५ प्रवासी जखमी झाले आहेत.

मुरबाड आगाराची कल्याण-नाव्ही ही बस नाशिकहून मालेगावकडे येत असताना उमराणे गाव सोडल्यावर एक किलोमीटर अंतरावर उलटली. बस रस्त्यावर धावत असताना चालकाने स्वतःच्या सीटवर मागील बाजूस उजवीकडे मान टेकवली. त्यानंतर काही क्षणातच बसवरील त्याचे नियंत्रण सुटल्याने ती अगोदर रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर आदळली आणि नंतर पुढे जाऊन उलटली. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे बसमधील प्रवाशांचा एकच थरकाप उडाला. अपघाताची माहिती समजतात उमराणे येथील जाणता राजा मित्र मंडळ व प्रहार संघटनेचे कार्यकर्ते तसेच स्थानिक गावकरी मदतीसाठी धावून गेले. बसमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांना त्यांनी बाहेर काढले व जखमींना उपचारासाठी मालेगावकडे रवाना केले.

अपघातग्रस्त बसमध्ये एकूण ३० प्रवासी होते. त्यातील पाच जणांना अधिक दुखापत झाल्याने त्यांच्यावर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. किरकोळ जखमी २० प्रवाशांना येथील सामान्य तसेच खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. या प्रकरणी बस चालकाविरोधात देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपघातानंतर मालेगाव आगाराच्या प्रमुख मनीषा देवरे या आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाल्या.

चालकाने मान टेकवली का ?

चालकाने स्वतः बसलेल्या सीटवर मान टेकवल्याने बसवरील नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. तथापि, चालकाने सीटवर मान का टेकवली, याबद्दल वेगवेगळ्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. या अपघातात जखमी झालेले जळगाव येथील एक प्रवासी चालकाच्या मागच्या बाकावर बसलेला होता. या प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार चालकाला डुलकी आल्यामुळे अपघाताचा प्रसंग घडला असण्याची एक शक्यता वर्तविण्यात येत आहे.

‘चालकाला आधी डुलकी आली व नंतर त्याने आपल्या सीटवरच मान टेकवली. आता काही तरी अघटित घडेल याची कल्पना आल्याने आवाज देऊन चालकाला जाणीव करून देण्याचा प्रयत्न आपण केला, परंतु तोपर्यंत बसचे नियंत्रण सुटले होते’ असा घटनाक्रम या प्रवाशाने कथन केला आहे. तर एखाद्या आजारपणामुळे चालकाची मान सीटवर टेकली गेली असावी, असा कयास काही जणांकडून लावला जात आहे. अपघातात बसचालक संजय शेळके हे देखील जखमी झाले आहेत. त्यांनी मात्र डुलकी आल्यामुळे हा अपघात झाला, यास नकार दिला. अचानक पुढे आलेल्या एका दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याचे त्यांचे म्हणणे आहे.