मालेगाव : रस्त्यात उभ्या असलेल्या कंटेनरवर वाहन आदळून झालेल्या अपघातात वडिलांच्या अंत्यविधीसाठी निघालेल्या दोन मुलींसह जावई अशा तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. युवती गंभीर जखमी आहे. गुरुवारी राष्ट्रीय महामार्गावरील मालेगाव तालुक्यातील वाके फाट्याजवळ हा अपघात झाला.

मीनाक्षी अरुण हिरे (५३, रा.टिटवाळा, ठाणे), अनिशा विकास सावंत (४०) आणि विकास चिंतामण सावंत (४५, ठाकुर्ली, जि.ठाणे) अशी या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. अपघातात वैभवी प्रवीण जाधव (१७, रा.नाशिक) ही गंभीर जखमी झाली असून तिला नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा – नाशिकमध्ये तीन दिवसात हिट अँड रनच्या तीन घटना – दोन महिलांसह युवकाचा मृत्यू

मीनाक्षी आणि अनिशा या दोघी बहिणी होत्या. मालेगाव तालुक्यातील निमगाव येथील रहिवासी असलेल्या त्यांच्या वडिलांचे मुंबई येथे निधन झाले. अंत्यविधीसाठी त्यांचा मृतदेह एका शववाहिकेतून निमगाव येथे आणण्यात येत होता. शववाहिकेबरोबर जावई विकास सावंत हे स्वत:च्या वाहनाने येत होते. या वाहनात त्यांची पत्नी अनिशा, मेहुणी मीनाक्षी आणि नाशिक येथील दुसऱ्या मेहुणीची मुलगी वैभवी असे चौघे होते.

हेही वाचा – धुळ्यातील पांझरा नदीत पोषण आहाराची शेकडो रिकामी पाकिटे, कारण काय ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास मालेगाव तालुक्यातील वाके फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरवर त्यांचे वाहन धडकले. हा अपघात एवढा भीषण होता की वाहनाच्या पुढील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. त्यात वाहनातील विकास, अनिशा, मीनाक्षी या तिघांचा मृत्यू झाला. वैभवी जखमी झाली. अपघाताची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील गंभीर जखमी वैभवीला तातडीने मालेगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर तिला नाशिक येथे हलविण्यात आले. अपघात प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.