काही दिवसांपासून उन्हाळ कांद्याचे भाव ७०० रुपयांच्या आसपास गटांगळ्या खात असताना गुरुवारपासून नाफेड राज्यात कांदा खरेदी सुरू करीत आहे. या निमित्ताने देवळा तालुक्यातील उमराणे येथील खरेदी केंद्रावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नाफेड बाजार भावाने खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांना दरवाढीत लाभ होत नसल्याचा उत्पादकांचा आक्षेप आहे. दुसरीकडे नाफेडच्या खरेदीमुळे दर उंचावत असल्याचा दावा केला जातो. यावर्षी नाफेड आणि एनसीसीएफ यांच्यावतीने राज्यात तीन लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करण्यात येणार आहे. नाफेडच्या खरेदीमुळे कांद्याच्या घाऊक बाजारात काय बदल होतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

हेही वाचा >>> नंदुरबार: खांडबारा बाजारपेठेत पेटत्या ट्रॅक्टरचा थरार; चालकाची समयसुचकता

राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नाफेडमार्फत उन्हाळी कांदा खरेदी सुरू होत असल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी म्हटले आहे. डॉ. पवार यांच्या हस्ते उमराणे येथे या खरेदीचा शुभारंभ होणार आहे. याप्रसंगी आ. डॉ. राहुल आहेर यांच्यासह कांदा उत्पादक शेतकरी संघटनाचे प्रतिनिधी व शेतकरी उपस्थित राहणार आहे. पावसाच्या तोंडावर सध्या बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढलेली आहे. चाळीत साठविण्याची व्यवस्था व क्षमता नसलेले शेतकरी कांदा बाजार समित्यांमध्ये आणत आहेत. लासलगाव बाजार समितीत बुधवारी कांद्याला सरासरी ७०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाले. काही दिवसांपासून कांद्याचे दर याच पातळीत राहिले आहेत. हे दर उत्पादन खर्चापेक्षा कमी असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. या स्थितीत नाफेडची कांदा खरेदी दरावर काय परिणाम करते की नाही याची छाननी पुन्हा शेतकऱ्यांकडून होणार आहे.

हेही वाचा >>> बिहारमधून महाराष्ट्रात बालकांची तस्करी; दानापूर – पुणे एक्स्प्रेसमधून ५९ बालकांसह पाच संशयित ताब्यात

केंद्र सरकार नाफेड आणि भारतीय राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संघ (एनसीसीएफ) यांच्यामार्फत राज्यात तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे. नाफेडमार्फत कांदा खरेदी व्हावी, यासाठी अनेक शेतकरी संघटना व शेतकरी मागणी करीत होते. त्या अनुषंगाने केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांची भेट घेतली. कांद्याच्या घसरलेल्या किंमती विचारात घेऊन नाफेडमार्फत कांदा खरेदी प्रक्रिया तात्काळ राबविण्यात यावी, अशी आग्रही मागणी केली होती. त्याची दखल घेत गुरुवारपासून जिल्ह्यात १४ फेडरेशन व नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत तसेच पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, अहमदनगर या जिल्ह्यातही प्रत्यक्ष कांदा खरेदीला सुरवात होणार असल्याची माहिती डॉ. पवार यांनी दिली. यंदा महाराष्ट्रात कांद्याचे मोठ्या प्रमाणात पीक आले आहे. नाशिक जिल्ह्यात राज्यातील ८० टक्के कांदा खरेदी-विक्री केला जातो. दर घसरल्याने शेतकऱ्यांना कमी दराने कांदा विक्री लागत होता. अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी संबंधित मंत्रालयाकडे पाठपुरावा केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

खरेदी दर उंचावण्यासाठी नाही

नाफेड आणि एनसीसीएफ राज्यात तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे. कांद्याचे दर उंचावण्यासाठी नाफेड खरेदी करीत नाही. कांद्याचे किरकोळ बाजारात भाव वाढल्यास ग्राहकांना दिलासा देण्यासाठी कांद्याचा राखीव साठा करण्यासाठी दर स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत कांद्याची खरेदी केली जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कांद्याची सद्यस्थितीउन्हाळ कांद्याच्या दरात मागील काही दिवसांपासून चढ-उतार होत आहे. कांद्याच्या सर्वात मोठ्या लासलगाव बाजार समितीत बुधवारी सुमारे १८ हजार क्विंटलची आवक झाली होती. व्क्विंटलला किमान ४०० ते कमाल १२६२ आणि सरासरी ९५० रुपये दर मिळाले. अन्य बाजार समित्यांमध्ये यापेक्षा वेगळी स्थिती नाही. दरवर्षी नाफेडकडून साधारणत: एप्रिल महिन्यापासूनच कांद्याची खरेदी केली जाते. परंतु यावर्षी मे महिना संपत आला तरीही नाफेडची कांदा खरेदी प्रत्यक्षात सुरू झाली नव्हती. त्यावरून उत्पादक संघटनेकडून रोष प्रगट झाला होता. गेल्या वर्षी नाफेडच्या कांदा खरेदीवर उत्पादक संघटनेने आक्षेप घेतले होते. बाजारभावाने ही खरेदी केली जात असल्याने शेतकऱ्यांना लाभ मिळत नसल्याची तक्रार होती.