नाशिक : नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकी जाहीर होताच सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक कामाला लागले आहेत. सर्वांची स्थिती रात्र थोडी सोंगे फार अशी झाली आहे. मतदानाला अवघे २८ दिवस शिल्लक राहिल्याने उमेदवारी मिळविण्यापासून तर मतदारांच्या गाठीभेटीपर्यंत सर्वकाही जलद करावे लागणार आहे. त्यातच यंदाही थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडणूक असल्याने या नगरपरिषद निवडणुकीला एक वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव नगरपालिकेवरील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी शिवसेना (एकनाथ शिंदे) प्रयत्न करणार असून त्यांना ठाकरे गटाकडून कितपत आव्हान मिळेल, याची उत्सुकता आहे. महायुती न झाल्यास राष्ट्रवादीही (अजित पवार) राहू शकेल.

स्थानिक पातळीवर पक्षांच्या बैठका सुरु होऊन इच्छुकांची मते जाणून घेत मुलाखती घेण्यात येत आहेत..राष्ट्रवादी, भाजप यांच्या मुलाखत बैठका पार पडल्या आहेत. दुसरीकडे, आपली उमेदवारी निश्चित असल्याचे समजून काही जणांनी मतदारांशी संपर्कही सुरु केला आहे..मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेची एकहाती सत्ता नगरपरिषदेवर होती..यामध्ये एकसंघ शिवसेना ११, राष्ट्रवादी ४ तर काँग्रेस २ असे पक्षीय बलाबल होते..नंतर राष्ट्रवादीचे २ नगरसेवक हे शिवसेनेत डेरेदाखल झाले. दुसरीकडे सलग दोन विधानसभा निवडणुकीत माजी आमदार पंकज भुजबळ आणि पाठोपाठ माजी खासदार समीर भुजबळ यांना नांदगाव विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याने राष्ट्रवादीच्या ( अजित पवार ) गोटात काहीशी अस्वस्थता आहे..नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांच्या बैठका मध्यंतरी पार पडल्या..मात्र छगन भुजबळ गट ताकदीने या निवडणुकीत उतरेल की नाही, हा प्रश्न अजूनही गुलदस्त्यात आहे..जनतेतून थेट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडायचा असल्याने उमेदवारी देतांना त्याची सामाजिक बांधिलकी, लोकप्रियता, तसेच केलेल्या कामांचा विचार करता उमेदवारी जाहीर करावी लागणार आहे.

नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी संदर्भात शिवसेनेकडून (एकनाथ शिंदे) माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, अरुण पाटील,चेतन पाटील, माजी नगरसेवक किरण देवरे ही नावे चर्चेत आहेत..भाजपकडून व्यापारी जिल्हा आघाडीचे दत्तराज छाजेड, संजय सानप यांचे तर शिवसेना ( ठाकरे गट ) कडून संतोष गुप्ता आदींची नावे अग्रक्रमाने घेतली जात आहेत..सध्या सुरु असलेल्या पक्ष मुलाखती यावर उमेदवारी ठरणार असून उमेदवारी नक्की कोणाला मिळते हे लवकरच अधिकृतरित्या कळेल..स्थानिक पातळीवर महायुती, महाविकास आघाडी होते की नाही, हे अद्याप अनिश्चित आहे.

नांदगावचा पाणीप्रश्न आणि विविध विकास कामांच्या मुद्द्यावर मागील निवडणुकीत पालिकेची सत्ता हस्तगत करणाऱ्या शिवसेनेने १७ पैकी ११ जागा मिळवल्या होत्या. राष्ट्रवादीला अवघ्या ४ जागांवर समाधान मानावे लागले होते. माजी आमदार अनिल आहेर यांच्या पारड्यात २ जागा मिळाल्या होत्या.