नाशिक – मराठवाड्यातील जायकवाडी धरणाची एकूण क्षमता आहे १०२ टीएमसी. यामध्ये ७६ टीएमसी जिवंत साठ्याचे प्रमाण आहे. उर्वरित २६ टक्के मृतसाठा. यंदाच्या हंगामात एक जून ते नऊ सप्टेंबर या कालावधीत नाशिकमधून ७१ टीएमसी पाणी जायकवाडीकडे प्रवाहीत झाले आहे. जायकवाडीची गरज पूर्ण क्षमतेेने भागविण्याचे काम नाशिक व अहिल्यानगरमधून झाल्याचे चित्र आहे.
गोदावरी खोऱ्यातील समन्यायी पाणी वाटपाच्या मुद्यावरून दुष्काळी वर्षात मराठवाडा, नाशिक व अहिल्यानगरमध्ये संघर्ष होत आहे. या वर्षी मुसळधार पावसामुळे तो विषय राहिला नाही. जुलैमध्येच जायकवाडीचा साठा ६५ टक्क्यांहून अधिकवर गेल्यामुळे समन्यायीचा विषय संपुष्टात आला होता. पुढील काळात विसर्ग सुरू राहिला. गंगापूर, दारणा आणि पालखेड धरण समुहातील धरणांमधून सोडण्यात येणारे पाणी नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी पात्रातून पुढे मराठवाड्यातील जायकवाडी धरणाकडे जाते.
एक जून ते नऊ सप्टेंबर या कालावधीत ७० हजार ४०८ दशलक्ष घनफूट म्हणजे जवळपास ७१ टीएमसी पूरपाणी जायकवाडीकडे प्रवाहीत झाल्याची माहिती नाशिक पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. अहिल्यानगरमधील भंडारदरा, निळवंडे व मूळा धरणातून आतापर्यंत १३ टीएमसी पाण्याचा विसर्ग झाले असून याचा विचार करता नाशिक व नगरमधील धरणांमधून आतापर्यंत तब्बल ८५ हजार दशलक्ष घनफूट म्हणजे ८५ टीएमसी पाणी जायकवाडी धरणाकडे गेले, असे पाटबंधारे विभागाचे निवृत्त कार्यकारी अभियंता उत्तम निर्मळ यांनी नमूद केले.
पावसामुळे ऑगस्टअखेरपर्यंत नाशिक व नगरमधील मोठ्या प्रमाणात पूरपाणी जायकवाडी धरणाकडे जाण्याची ही मागील काही वर्षातील पहिलीच वेळ आहे. नाशिक जिल्ह्यात लहान मोठी २६ धरणे तुडुंब भरलेली आहेत. या धरणांमध्ये मंगळवारी ६८ हजार ७४१ म्हणजे ९८ टक्के जलसाठा आहे. महिनाभरापासून ही स्थिती कायम असल्याने अतिरिक्त पाणी सोडले जात आहे. १०२ टीएमसी क्षमतेच्या जायकवाडी धरणात ७६ टीएमसी इतका जिवंत जलसाठा आहे. उर्वरित मृतसाठा म्हणून गणला जातो. यंदा जायकवाडीची संपूर्ण गरज नाशिक व अहिल्यानगरमधून पूर्ण झाल्याचे उत्तमराव निर्मळ यांनी नमूद केले. हे धरण पूर्ण क्षमतेने भरून त्यातून विसर्ग करावा लागला.
धरण क्षमतेइतकाच विसर्ग…
नाशिक जिल्ह्यातील सात मोठ्या व १९ मध्यम अशा एकूण २६ धरणांची एकूण संकल्पित क्षमता ७० हजार ६१९ दशलक्ष घनफूट इतकी आहे. मंगळवारी यात ६८ हजार ७४१ दशलक्ष घनफूट म्हणजे ९८ टक्के जलसाठा आहे. तुडुंब भरलेल्या धरणांमधून यंदा नांदूरमध्यमेश्वरमधून आतापर्यंत २६ धरणांच्या संकल्पित क्षमतेइतकाच विसर्ग झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.