नाशिक : तळपत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी पक्षचिन्ह असलेल्या रंगीबेरंगी कापडी पट्ट्यांचा करण्यात आलेला वापर…गर्दीपासून काहीसे दूर होत तहान भागवण्यासाठी थंड पेयाचा घेतलेला आधार…आपल्या लाडक्या नेत्यांची छबी टिपण्यासाठी कार्यकर्त्यांची सुरू असलेली धडपड …घोषणांचा भडीमार, अशा उत्साहपूर्ण वातावरणात नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून अर्ज भरत उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांची एकत्रित शोभायात्रा काढण्याचे नियोजन असताना नाशिकचा उमेदवार पुढे आणि त्यानंतर दिंडोरीचा उमेदवार निघाले. वेगवेगळ्या रथांवरून आणि वेगवेगळ्या दिशेने निघालेले दोघांचे रथ जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ एकत्र आले.

नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघात २० मे रोजी मतदान होणार आहे. मतदानाची तारीख जवळ आल्याने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोमवारी इच्छुक उमेदवारांची गर्दी वाढली. दिंडोरीतून शरद पवार गटाचे भास्कर भगरे, नाशिकमधून उध्दव ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे, अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज, निर्भय पार्टीचे जितेंद्र भावे यांनी अर्ज भरले. जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयात कामासाठी येणाऱ्या सर्वसामान्य जनतेला पोलिसांकडून काही वेळासाठी आडकाठी करण्यात आली.

हेही वाचा…Video: जळगाव जिल्ह्यात केलेली चार विकास कामे दाखवा…भाजप उमेदवार रक्षा खडसेंना जाब

सकाळी ११ पासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक अडविण्यास सुरुवात झाली. महंत शांतिगिरी महाराज यांच्या फेरीला गौरी पटांगणापासून सुरूवात झाली. रामकुंड-रविवार कारंजा-रेडक्रॉस-महात्मा गांधी रोडमार्गे फेरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाली. फेरीतील अनेकांनी जय बाबाजी असे संदेश असलेले पोषाख परिधान केले होते. अनेकांच्या हातात बिरसा मुंडा, स्वातंत्र्यवीर सावरकर, राणी लक्ष्मीबाई यांच्यासह इतर महापुरूषांच्या प्रतिमा होत्या. बाबाजींना मते द्या, अशी फलकाव्दारे साद घालत फेरी जय बाबाजी असा जयघोष करत जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आली.

पाठोपाठ महाविकास आघाडीचे दिंडोरी मतदार संघातील उमेदवार भास्कर भगरे आणि नाशिकचे राजाभाऊ वाजे यांच्या शक्ती प्रदर्शनास सुरूवात झाली. दोघे मविआचे उमेदवार असल्याने एकत्रित फेरी निघेल, अशी अपेक्षा असतांना दोन्ही पक्षांकडून स्वतंत्र रथांचा वापर करण्यात आला. भगरे यांचा रथ इदगाह मैदानावरून जिल्हा परिषद-शिवसेना कार्यालय- शालिमार-सावानामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. दुसरीकडे, ठाकरे गटाच्या वतीने पक्ष कार्यालयापासून रथ काढण्यात आला. हा रथ शालिमारमार्गे मेनरोड-गाडगे महाराज पुतळा- रविवार कारंजा-रेडक्रॉस- एम.जी. रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आला. उमेदवारांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

हेही वाचा…आता शक्ती प्रदर्शनाची चढाओढ, नाशिकमुळे महायुतीचा दिंडोरीचा अर्ज भरण्याचा मुहूर्त लांबणीवर

भगरे आणि वाजे या मविआ उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनात कमालीची तफावत राहिली. भगरे यांचा रथ शिवसेना कार्यालयापर्यंत जाण्याआधीच ठाकरे गटाचा रथ पुढील दिशेने मार्गस्थ झाला होता. दोघांचे मार्गही वेगळे झाले. यामुळे गर्दी विखुरली गेली. नियोजन कोलमडल्याचे दिसून आले. भगरे यांच्या रथावर शरद पवार गट, ठाकरे गटाचे काही पदाधिकारी होते. वाजे यांच्या रथावर काही वेळासाठी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, ठाकरे गटाचे संजय राऊत यांच्यासह आम आदमी पक्ष, आयटकचे स्थानिक पदाधिकारी होते. जयंत पाटील यांना भगरे यांच्या रथावरही हजेरी लावावी लागली. भगरे आणि वाजे यांच्याकडून अर्ज दाखल करण्यात आल्यावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांची भाषणे झाली.

नाशिकमधून मविआचे राजाभाऊ वाजे, अपक्ष म्हणून महंत शांतिगिरी महाराज, दिंडोरीतून भास्कर भगरे या प्रमुख उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करुन अर्ज दाखल केले.

हेही वाचा…सहानुभूतीमुळे शरद पवार यांच्या सभांना गर्दी – छगन भुजबळ यांचे मत

भगरे यांच्याकडून उशीराने संदेश

महाविकास आघाडीचे दिंडोरीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्याकडून फेरीसंदर्भातील संदेश उशीराने आले. शिवसेना कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. ही गर्दी नियंत्रणात राहावी म्हणून ठाकरे गटाकडून फेरीस सुरूवात केली गेली. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मात्र दोघे एकत्र आले. – सुधाकर बडगुजर (जिल्हाप्रमुख, ठाकरे गट)

कार्यकर्त्यांची भोजनाची व्यवस्था

तळपत्या उन्हात शक्ती प्रदर्शनासाठी आलेल्या कार्यकर्त्यांच्या जेवणाची व्यवस्था महाविकास आघाडीकडून ईदगाह मैदानावर करण्यात आली होती. फेरी दरम्यान पिण्याच्या पाणी सर्वांना देण्यात येत होते. शांतिगिरी महाराज यांच्या जय बाबाजी परिवारातर्फेही कार्यकर्त्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

हेही वाचा…लेव्हीविषयी तोडगा न निघाल्यास मतदानावर बहिष्कार, माथाडी कामगारांचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाहतुकीचा बोजवारा

सोमवारी सकाळी शांतिगिरी महाराज, महाविकास आघाडीकडून भास्कर भगरे, राजाभाऊ वाजे यांनी उमेदवारी अर्ज भरले. अर्ज भरतांना उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. शक्ती प्रदर्शनासाठी जमलेल्या गर्दीमुळे शहरातील वाहतुकीचा खेळखंडोबा झाला. गडकरी चौक, त्र्यंबक नाका सिग्नल, जिल्हा परिषद, जुने सीबीएस, शालिमार आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. बाहेरगावहून आलेल्या प्रवाश्यांना रिक्षा किंवा अन्य वाहने मिळवतांना अडचणी आल्या.