नाशिक – संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या कुलस्वामीनी श्री रेणुका मातेचे प्राचीन देवस्थान नाशिक जिल्हयातील चांदवड येथे आहे. श्री रेणुका मातेचे हे मंदिर सह्याद्री पर्वतरांगेतील निसर्गरम्य परिसरातील टेकडीच्या गुहेत वसले आहे. भाविक भक्तांची दर्शनासाठी बाराही महिने वर्दळ असते.

चांदवड शहराजवळून गेलेल्या मुंबई-आग्रा महामार्गाशेजारील सहयाद्री पर्वताच्या डोंगररांगेत श्री रेणुकामातेचे देवस्थान आहे. आख्यायिकेनुसार श्री जमदग्नी ऋषींच्या आज्ञेनुसार पुत्र परशुरामाने स्वत:च्या आईचे शीर धडावेगळे करून पितृ आज्ञेचे पालन केले होते. त्यामुळे देवीच्या धडाचा भाग माहूर (ता. किनवट, नांदेड) येथे असून शीर चांदवड येथे आहे. नवरात्रोत्सवात दहा दिवस यात्रोत्सव भरतो.

उत्सव काळात श्री रेणुका मातेच्या शृंगाराची विधिवत सकाळ व सायंकाळच्या वेळी संपूर्ण गावातून पालखी मिरवणूक काढण्यात येते. तसेच दर महिन्यास असलेल्या पौर्णिमेला पालखी मिरवणूक काढण्यात येते. या पुरातन मंदिराचा जीर्णोध्दार अहिल्याबाई होळकर यांनी केला. मंदिरात दीपमाळ, पायऱ्या, मुख्य दरवाजा, सभामंडप, तीर्थ तलाव, आदीचे बांधकाम करण्यात आले आहे.

अहिल्याबाई होळकर या त्यावेळी भुयारी मार्गाने पालखीत बसून श्री रेणुका मातेचे अलंकार व पूजापाठ साहित्य घेऊन पूजा करीत असत. हीच प्रथा अहिल्यादेवीनंतर होळकर घराण्याकडून पुढे सुरु ठेवण्यात आली. सध्या होळकर ट्रस्ट रंगमहालमार्फत दर पौर्णिमेस व चैत्र पौर्णिमेस व नवरात्रात दहा दिवस पालखी काढण्यात येते.

मंदिराच्या उजव्या बाजूला रासलिंग इंद्रायणी किल्ला तर डाव्या बाजूस भगवान शिवशंकराचे चंद्रेश्वर मंदिर आहे. दर पौर्णिमेस रेणुकादेवीची पालखी सकाळी अहिल्यादेवींच्या रंगमहालातून देवीच्या मंदिरात जाते. सायंकाळी मंदिरातून रंगमहालात जाते, ही प्रथा अनेक वर्षापासून चालत आली आहे. मंदिराचा कारभार अनेक वर्षापासून अहिल्यादेवी होळकर सरकारकडे होता. सध्या मंदिराचा संपूर्ण कारभार ट्रस्टकडे आहे.

भाविकांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात मंदिर परिसरात सुधारणा करण्यात आल्या आहेत. पिण्याचे पाणी, दिवे, भाविकांना घटी बसण्यासाठी निवासगृह, जनरेटर, लग्न समारंभ व धार्मिक कार्यक्रमासाठी जागा, स्वयंपाकांसाठी भांडी, विद्युत घंटा, सीसीटीव्ही कॅमेरे आदी सुविधा करण्यात आल्या आहेत.

लोकप्रतिनिधींच्या यात्रा स्थळ विकास निधीतून भक्त निवास, विश्राम गृह, स्त्रियांसाठी प्रसाधन गृह, शिर्डीप्रमाणे रांगा लावणेसाठी स्टीलचे अडथळे, वाहनतळ, संपूर्ण मंदिर परिसरात सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्यात आली आहे. देवस्थानाला “ब” वर्गाचा दर्जा आहे.

मंदिरापर्यंत कसे जाणार ?

नाशिकच्या ओझर विमानतळावर उतरुन त्या ठिकाणापासून खासगी वाहन अथवा बसेने चांदवड येथे जाता येते. नाशिकहून खासगी वाहन किंवा बसने जाता येते. नाशिकपासून चांदवड हे ६५ किलोमीटरवर आहे. नाशिक-मालेगाव यादरम्यान महामार्गालगत चांदवडचे हे मंदिर आहे.