जळगाव – येथील जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आता नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी रूजू झाले आहेत. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या सोयीसाठी त्यांची बदली नाशिकला करून घेतल्याची चर्चा आता रंगली आहे. या पार्श्वभूमीवर, मंत्री महाजन यांनी गुरूवारी जळगावमध्ये त्या बाबतीत मौन सोडून थेट स्पष्टीकरण दिले.

जळगावमध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि जी. एच. रायसोनी महाविद्यालयातर्फे आयोजित युवारंग महोत्सवाचे उद्घाटन मंत्री महाजन यांनी गुरूवारी केले. या प्रसंगी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांची बदली त्यांच्या सोयीसाठी झाल्याच्या विरोधकांच्या आरोपांना त्यांनी प्रत्युत्तर दिले.

राज्य शासनाने मंगळवारी सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले. त्यानुसार, जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याही बदल्या करण्यात आल्या. दोन्ही आएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये मोठी खळबळ उडाली.

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एमपीडीए कायद्याचा बेजबाबदार वापर केल्याच्या ठपका ठेवत दोन लाखांचा दंड ठोठावण्यात आलेले जिल्हाधिकारी आयुष प्रसाद चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यानंतर काही दिवसातच शासनाने त्यांची नाशिकला बदली केल्याने त्याचे विविध अर्थ लावले गेले.

दरम्यान, नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची बदली नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एनएमआरडीए) आयुक्त म्हणून करण्यात आली. नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्याला दीड वर्षांपेक्षा कमी कालावधी बाकी असताना, हजारो कोटी रूपयांच्या कामांना प्राधान्याने चालना दिली जात आहे. अशा वेळी नेमकी नाशिकचे जिल्हाधिकारी शर्मा यांची बदली करण्यात आली.

याशिवाय, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त म्हणून नियुक्ती केली गेली. प्रशासकीय पातळीवर व्यापक नियोजनासह कोट्यवधींच्या कामांना चालना दिली जात असताना, निर्णय प्रक्रियेत सहभागी प्रमुख अधिकाऱ्यांची कुंभमेळा होईपर्यंत सहसा बदली केली जात नाही. तरीही जलज शर्मा यांची बदली झाली.

या सगळ्या वेगवान घडामोडीत शर्मा यांचे नाशिकमध्येच दुसर्‍या जागेवर पुनर्वसन करून जळगावहून अचानक बदली झालेले आयुष प्रसाद यांना त्यांच्या जागी अलगद बसविले गेले. एकूण सर्व प्रकार लक्षात घेता राजकीय वर्तुळातून उलटसुलट चर्चांना त्यामुळे दोन दिवसांपासून उधाण आले आहे. मंत्री महाजन यांनी त्यांच्या मर्जीतील जिल्हाधिकाऱ्यांना नाशिकमध्ये बसवून आपली सोय केल्याचेही बोलले जात आहे.

या विषयी पत्रकारांनी विचारणा केल्यावर मंत्री गिरीश महाजन म्हणाले, की माझ्या मर्जीतील जिल्हाधिकारी वगैरे असा काही प्रकार काही नाही. अधिकारी शेवटी अधिकारीच असतात. आता जळगावला रूजू झालेले नवीन जिल्हाधिकारी देखील माझ्या मर्जीतील आहेत, असे तुम्ही सांगाल. नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता आणि त्यांची बदली होणार होतीच. त्यामुळे आयुष प्रसाद यांची त्यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली. दुसरा काही विषय नाही.