शहरातील वेगवेगळ्या भागांतून महिलांच्या अंगावरील दागिने खेचून नेणाऱ्या तीन चोरटय़ांविरोधात येथील विशेष जिल्हा न्यायालयात मोक्कांतर्गत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या संशयितांच्या अटकेमुळे सोनसाखळी चोरीचे १२ आणि वाहन चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले होते. त्यांच्याकडून १६ तोळे सोने आणि गुन्ह्य़ासाठी वापरलेल्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात होत्या.

किशोर धोत्रे (२९), बाळू जाधव (३२, दोघेही रा. शांतीनगर, अंबड) आणि विनोद पवार (२९, इंदिरानगर) अशी संशयितांची नावे आहेत. अंबड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्य़ात त्यांना अटक करण्यात आली होती.

या संशयितांनी सातपूर व नगरमधील राहता येथून पल्सर व स्प्लेंडर दुचाकी चोरून शहरातील अंबड, आडगाव, सातपूर, सरकारवाडा, गंगापूर, भद्रकाली, इंदिरानगर, मुंबई नाका परिसरात रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोन्याची पोत जबरीने ओढून लंपास केले होते. अशा १२ तसेच मोटारसायकल चोरीचे दोन अशा एकूण १४ गुन्ह्य़ांमध्ये त्यांचा सहभाग निष्पन्न झाला.

त्या त्या गुन्ह्य़ातील १६ तोळे सोने तसेच गुन्ह्य़ासाठी वापरलेल्या दोन स्प्लेंडर व एक पल्सर अशा तीन मोटारसायकल असा एकूण पाच लाखांचा माल हस्तगत करण्यात आला होता.

संशयितांनी हे गुन्हे संघटित होऊन केले असल्याने त्यांच्या कारवायांमुळे शहरात महिला वर्गात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. संघटित गुन्हेगारी कृत्यामुळे पोलीस आयुक्तांच्या परवानगीने धोत्रे, जाधव व पवार यांच्याविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली होती. मोक्का कायद्यातील तरतुदीनुसार तपास केल्यानंतर संशयितांविरुद्ध सबळ पुरावा उपलब्ध झाला. त्यामुळे संशयितांविरुद्ध मोक्कांतर्गत दोषारोपपत्र सादर करण्यास अपर पोलीस महासंचालकांनी मान्यता दिली. त्यानुसार पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

हर्षदा अहिरेच्या खून प्रकरणात प्रियकरास अटक

एकलहरा रोडवरील युवतीच्या हत्या प्रकरणाचा छडा लावत या प्रकरणात तिचा प्रियकर संशयित रोहित पाटीलला पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले. संशयिताने हर्षदा अहिरेचा खून करून तिचा मृतदेह एकलहरा रस्त्यावर जाळण्याचा प्रयत्न केला. हर्षदाने लग्नासाठी वारंवार लावलेल्या तगाद्याला कंटाळून तिची हत्या केल्याची कबुली रोहितने दिली.  हा सर्व प्रकार त्याने अतिशय थंड डोक्याने करत कोणाला संशय येऊ नये यासाठी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी तो स्वत तिच्या पालकांसोबत आला होता.

मंगळवारी सकाळी येथील एकलहरा परिसरात एका युवतीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. अवघ्या आठ दिवसांत नाशिकरोड परिसरातील खुनाची तिसरी घटना असल्याने पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत वेगाने चक्रे फिरवली.

सायंकाळी त्या युवतीची ओळख पटली. म्हसरूळच्या दिंडोरी रोड परिसरात राहणारी हर्षदा अहिरे (२२) ही बेपत्ता झाली होती. नातेवाईकांनी अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी हर्षदाचे ‘कॉल डिटेल्स’ची माहिती मिळवून तपास सुरू केला. तिचे आईवडील गंगापूर पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार घेऊन आले, तेव्हा तिचा प्रियकर मित्र संशयित रोहित पाटील (२१, रा. अशोकनगर) हा सोबत होता. हर्षदाचे शेवटचे बोलणे रोहितशी झाल्याचे लक्षात आले. चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. रोहित व हर्षदा यांचे काही वर्षांंपासून प्रेमसंबंध होते. हर्षदाच्या घरी त्यांच्या लग्नासाठी पाठिंबा होता. मात्र रोहितकडे नकार असल्याने त्याने सुरुवातीपासून शिक्षण पूर्ण करायचे असे सांगत हा विषय टाळला. त्यावरून उभयतांमध्ये वाद होत असे.

दरम्यान, रात्र झाली तरी हर्षदा घरी का आली नाही म्हणून तिच्या पालकांकडे त्याने विचारणाही केली. सकाळी हर्षदाविषयी काही कळाले का, अशी विचारणा जेव्हा तिच्या पालकांकडून आली, तेव्हा तो त्यांच्यासोबत गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास आला. आपण तिला शोधू असे सांगत पालकांसोबत वावरला. भ्रमणध्वनी रेकॉर्डवरून संशयित रोहितचे हर्षदाशी शेवटचे बोलणे झाले होते. यामुळे या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणी रोहितला अटक करण्यात आली आहे.

मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न

सोमवारी घरातील मंडळी बाहेरगावी असल्याची संधी रोहित याने साधली. हर्षदाशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत तिला अशोकनगर येथील घरी बोलावले. त्या ठिकाणी त्यांच्यात लग्नावरून वाद झाले. या वादावादीत रोहितने तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. घाव वर्मी बसल्याने हर्षदाचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकाराचा कोणताही पश्चात्ताप न करता शांतपणे त्याने हर्षदाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे ठरवले. सायंकाळी उशिरा अंधार पडल्यावर आपली मॅस्ट्रो दुचाकी आणत हर्षदाला पुढे बसवून सोबत रॉकेलचा कॅन घेतला. काही झालेच नाही अशा आविर्भावात त्याने थेट नाशिकरोड गाठले. उड्डाण पुलावरून त्याने सिन्नरफाटा गाठत एकलहरा रस्त्याकडे आपला मोर्चा वळविला. अंधारात असलेल्या गवळीबाबा मंदिराजवळील निर्जनस्थळी हर्षदाचा मृतदेह उतरवत त्याने तिच्या अंगावर घासलेट ओतले. मृतदेहाला आग लावत तो पूर्ण जळाल्याची खात्री झाल्यावर त्याने पलायन केले.