नाशिक – नाशिककरांना आता हत्या, लुटमार, हाणामारी, वाहनांची तोडफोड, कोयते, तलवारी, चाकू हे शब्द परवलीचे झाले आहेत. सणासुदीचे दिवस असोत किंवा अन्य कोणताही दिवस. दररोज यापैकी काहीना काही घडत आहे. नाशिक रोड परिसरात दसऱ्याची पहाट वाहनांच्या तोडफोडीने उगवली. आणि दसऱ्याचा शेवट युवकाच्या हत्येने झाला.
जानेवारीपासून सप्टेंबरपर्यंत या वर्षी ४२ हत्यांची नोंद नाशिकमध्ये झाली आहे. त्यात आता ऑक्टोबर मधील या पहिल्या हत्येची भर पडल्याने या वर्षातील हत्यांची संख्या आता ४३ झाली आहे.
नाशिकमध्ये सर्वसामान्यांना गुंडांमुळे जगणे असह्य झाले असताना इतके दिवस सत्ताधारी भाजपचे आमदार, पदाधिकारीही निद्रिस्त होते. परंतु, महायुतीतील मित्रपक्षच गुन्हेगारीवरून कुरघोडी करु लागल्याचे लक्षात येताच भाजपला जाग आली. पोलीस आयुक्तांची भेट घेण्यात आली. त्यांना गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी सूचना करण्यात आल्या. परंतु, पोलीसांना आणि राजकीय पक्षांना कोणतीही किंमत देण्यास गुंड तयार नसल्याचे दसऱ्याच्या दिवशी पुन्हा दिसून आले.
काही दिवसांपूर्वी नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारीचा विषय सर्वप्रथम शिवसेना (उध्दव ठाकरे) आणि मनसे यांनी संयुक्तपणे मांडला. त्यांच्या वतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला होता. परंतु, त्यानंतरही विशेष फरक पडला नाही. शहरात गुन्हेगारी कारवाया वाढतच राहिल्या. शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत याच आठवड्यात महायुतीतील शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) मंत्री दादा भुसे यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन चिंता व्यक्त केली होती.
पोलिसांना त्यांनी काही सूचनाही केल्या होत्या. त्यानुसार पोलीस आता रस्त्यावर दिसतील, अशी अपेक्षा भुसे यांनी व्यक्त केली होती. विशेष म्हणजे, राज्याचे गृह खाते भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असताना भाजपचे नाशिकमधील तीनही आमदार वाढत्या गुन्हेगारीविषयी गुपचूप होते.
परंतु, नाशिककरांमधील वाढता रोष आणि मित्रपक्षाच्या मंत्र्यांनीच या विषयावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केल्यावर भाजपच्या तीनही आमदारांनी भुसे-पोलीस आयुक्त भेटीनंतर दुसर्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेत घेत त्यांना गुन्हेगारी रोखण्यासाठी साकडे घातले. त्यानंतर दुसर्याच दिवशी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची तीनही आमदारांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह भेट घेतली.
दसरा नाशिकरोडला हादरा देणारा ठरला. पहाटे नाशिकरोड परिसरातील धोंगडेनगर, डावखरवाडीत दुचाकीने आलेल्या तीन जणांनी पाच ते सहा वाहनांची तोडफोड केली. वाहनतळात उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याने परिसरातील रहिवाशांच्या दसऱ्याच्या आनंदावर विरजण पडले.
दिवसभर या घटनेची चर्चा सुरु असताना नाशिक रोडच्या गोरेवाडीतील जाधववाडी रात्री युवकाच्या हत्येने हादरली. रात्री दांडिया खेळत असताना किरकोळ वादातून टोळक्याने कृष्णा ठाकरे या युवकावर कोयते तसेच धारदार शस्त्राने वार केले. त्यात त्याचा मृत्यू झाला. नाशिक रोड पोलीसांनी तत्काळ कारवाई करीत संशयित मोईन शेख, चिराग उर्फ मोगिनी बारसे, यश बारसे, प्रकाश उर्फ आशू बारसे यांना ताब्यात घेतले.