नाशिक – प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी त्र्यंबकेश्वरजवळील पेगलवाडी फाटा येथे एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने भीक मांगो आंदोलन करण्यात आले. आदिवासी पाड्यावरील कामांसाठी निधी मिळत नसल्याने आंदोलनकर्त्या महिलांनी वाहन चालक तसेच परिसरातील लोकांपुढे पदर पसरत भीक मागितली. या माध्यमातून जमा झालेला निधी हा शासनाच्या तिजोरीत टाकण्यात येईल, असे आंदोलकांनी सांगितले.
त्र्यंबकेश्वर तालुक्यात अनेक आदिवासी पाडे आहेत. बऱ्याच पाड्यांवर वीज नाही. रस्ते नाहीत, पिण्यासाठी पाणी नाही. रस्ता दुरूस्तीसाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. पिण्याच्या पाण्यासाठी महिला दिनी जिल्हा परिषद कार्यालयावर आणि पाणी पुरवठा मंत्री यांच्या कार्यालयावर हंडा मोर्चाही काढला. डहाळेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात यावे, यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयासमोर पिंडदान आंदोलनही केले होते. वेगवेगळ्या पध्दतीने शासनाच्या बेपर्वा वृत्तीचा निषेध करुनही सरकार, प्रशासन ढिम्म असल्याने संघटनेच्या वतीने भीक मांगो आंदोलन करण्यात आले.
त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यातील अनेक रस्ते खराब झाल्याने अपघात होत आहेत. या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी वर्षांपासून एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु, रस्ता दुरुस्तीची कामे झालेली नाहीत.
संघटनेच्या वतीने त्र्यंबक तालुक्यातील सापगाव, हर्षवाडी, कळमुस्ते. देवगाव ते पालघर जिल्हा हद्द, त्र्यंबक ते नाशिक रस्ता, वैतरणा धरण ते अळवंडी धरण, जोशी कंपनी ते झारवड, टाके देवगाव ते ऐल्याची मेट या सर्व रस्त्यांची दुरुस्ती करावी, रस्त्याची वेळेत काम न करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करून काळ्या यादीत टाकावे, जल जीवन योजनेच्या कामात भ्रष्टाचार करून निकृष्ट दर्जाचे काम करून आदिवासी पाड्यांना पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या ठेकेदार, अधिकारी यांच्यावर कारवाई करावी, त्र्यंबक आणि इगतपुरी तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाचे अनुदान तत्काळ बँक खात्यावर जमा करावे, बाल विकास प्रकल्पाकडून चालू जाणाऱ्या अंगणवाडी केंद्रांना तत्काळ इमारती मंजूर कराव्यात.
डहाळेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तत्काळ सुरू करावे, या सर्व मागण्यांची तत्काळ पूर्णत: करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मागण्या मान्य न केल्यास एल्गार कष्टकरी संघटना आंदोलन अधिक तीव्र करणार, असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी तानाजी कुंडे, गणपत गावंडे, वसंत इरते, सुरेखा मधे, मंगल खडके, मथुरा भगत, संजय पारधी, हनुमंत सराई आदी उपस्थित होते. या आंदोलनामुळे पेगलवाडी परिसरात वाहतुकीचा खोळंबा झाला. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.