नाशिक – महायुतीत नाशिक जिल्हा पालकमंत्री पदाविषयीचा वाद पुन्हा उफाळून आला आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नाशिकच्या पालकमंत्रीपदी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) मंत्री दादा भुसे यांची नियुक्ती व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली असली तरी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त होणारा मुख्य ध्वजवंदन सोहळा भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीतच होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपने बाजी मारली असून अधिकृतरित्या महाजन यांची पालकमंत्री म्हणून घोषणा झालेली नसली तरी महाजन हेच नाशिकवर वर्चस्व राखून आहेत. त्यामुळे महायुतीतील शिंदे गट आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यातील अस्वस्थता वाढीस लागली आहे.
महायुती राज्यात पुन्हा सत्तेत आल्यापासून नाशिक आणि रायगड जिल्हा पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही. जानेवारीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदी अनुक्रमे आदिती तटकरे आणि गिरीश महाजन यांची नियुक्ती जाहीर केली होती. परंतु, ही नियुक्ती जाहीर होऊन चोवीस तासही उलटत नाही तोच नियुक्तीला स्थगिती द्यावी लागली होती. तेव्हांपासून दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद रिक्तच आहेत.
नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे (अजित पवार) सर्वाधिक आमदार असल्याने त्यांच्याकडूनही पालकमंत्रीपद आपल्याकडे असावे, असा आग्रह धरण्यात येतो. परंतु, पालकमंत्रीपदाविषयी अधिक रस्सीखेच भाजप आणि शिंदे गट यांच्यातच आहे.
आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, सोमवारी नाशिक येथे शिंदे गटाची विभागीय आढावा बैठक झाली. या बैठकीप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची पुन्हा निवड व्हावी, अशी शिवसैनिकांची तर, पालकमंत्रीपदी दादा भुसे हे असावेत, अशी आपली इच्छा असल्याचे नमूद केले होते.
उदय सामंत यांनी नाशिकचे पालकमंत्रीपद शिंदे गटाकडेच असावे, असे मत मांडले असले तरी पालकमंत्रीपद नसतानाही भाजपचे गिरीश महाजन यांनी नाशिकचा ताबा घेतल्याचे चित्र आहे. कुंभमेळा मंत्री म्हणून सर्व बैठका महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीतच होतात. शिंदे गट आणि अजित पवार गट यांना अशा बैठकांमध्ये किती गौण स्थान दिले जाते, याचा अनुभव स्थानिक नेत्यांनी घेतला आहेच. या पार्श्वभूमीवर, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त होणाऱ्या मुख्य सोहळ्यात कोणाला ध्वजवंदन करण्याचा मान मिळतो, याकडे महायुतीतील तीनही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष होते. पुन्हा एकदा भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना नाशिक येथे ध्वजवंदनाचा मान मिळाल्याने शिंदे गटात नाराजी आहे. अप्रत्यक्षरित्या महाजन हेच नाशिकचे पालकमंत्री यावर एकप्रकारे शिक्कामोर्तब झाल्याचे यामुळे मानले जात आहे.