नाशिक – सातपूर परिसरात बुधवारी आणि गुरुवारी दिवसाआड अपहरण आणि मारहाणीचे दोन प्रकार घडले. या दोन्ही घटनांना प्रेम प्रकरणाची किनार असल्याचे सांगितले जाते. एका प्रकरणात अपहरण करणारा विवाहितेचा जुना मित्र तर, दुसऱ्या घटनेत विवाहितेशी अवैध संबंध असणाऱ्याचा सहभाग असल्याचे आढळून आले आहे. यातील एका अपहरणाची चित्रफित समाजमाध्यमात प्रसारित झाल्यामुळे नागरिकांमध्ये भरदिवसा घडलेल्या या प्रकाराने दहशतीचे वातावरण होते.. या दोन्ही प्रकरणात दोन अल्पवयीनांसह इतर चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

अपहरणाच्या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती उपायुक्त किशोर काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास हिंद सोसायटीसमोरील एका दुकानात तीन जण चहा पित होते. त्यापैकी तक्रारदार युवकाच्या पत्नीशी लग्नाआधी प्रेमसंबंध असलेला संशयित प्रियकर गिरीश शिंगोटे हा चार ते पाच साथीदारांसह आला. त्यांनी तक्रारदारास पांढऱ्या रंगाच्या मोटारीत नेऊन अपहरण करण्याच्या उद्देशाने बेदम मारहाण केली. पुढे काही अंतरावर या गाडीतून तक्रारदाराने स्वत:ची सुटका करुन घेत सातपूर पोलीस ठाणे गाठून पोलिसांना सर्व घटनेची माहिती दिली.

संबधिताच्या तक्रारीवरून सातपूर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी दोन विधीसंघर्षित मुलांसह अजून एकास ताब्यात घेण्यात आले. उपायुक्त किशोर काळे, सहायक आयुक्त शेखर देशमुख, प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राकेश न्हाळदे करत आहेत.

अपहरणाची दुसरी घटना गुरुवारी घडली. सातपूर येथील तक्रारदाराचे संशयिताच्या पत्नीशी संबंध असल्याच्या कारणावरून तक्रारदारास देवळाली गावातील तीन संशयितांनी मारहाण करत चारचाकी वाहनात जबरदस्तीने टाकून अपहरण केले. उपनगर आणि सातपूर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत तीनही संशयितांना ताब्यात घेण्यात आले. यापैकी दोघांविरुध्द याआधीच काही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ व प्रभारी निरीक्षक सचिन खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे, गुन्हे शोध पथकाचे देसले, गुंजाळ, शेजवळ आदींनी बजावली.