नाशिक – सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक नगरी सज्ज होत असताना शहरातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. हाॅटेलमध्ये, कॅफेत, चौकात, बाजारपेठेत, दिवसा, रात्री कधीही आणि कुठेही नाशिकमध्ये बिनदिक्कतपणे गुंडांच्या टोळ्या कोयते, तलवारी, चाकू नाचवत फिरत आहेत. हत्या करीत आहेत.
सहा महिन्यात २४ हत्या होणे, हे कोणत्याही पोलीस दलासाठी शोभनीय नक्कीच नाही. यातील काही हत्या पूर्ववैमनस्यातून तर काही निव्वळ पैशांसाठी होत आहेत. हे हत्यासत्र गुंड टोळ्यांपुरताच मर्यादित होते, तोपर्यंत इतरांनही त्यांच्याशी फारसे काही देणेघेणे नव्हते. परंतु, आता थेट सर्वसामान्यांची लुटमार, हत्या होऊ लागल्याने पोलिसांविषयी असंतोष वाढू लागला आहे. संशयितांना ताब्यात घेवून त्यांची त्या परिसरात मिरवणूक (धिंड) काढणे एवढेच काम न करता गुंडांना कायस्वरुपी जरब बसेल, अशी कोणतीही कारवाई होताना दिसत नसल्याने गुंडांचे फावले आहे.
नाशिकमध्ये राजकीय पक्ष महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करीत असतांना निवडणुकीत त्यांनाही असामाजिक घटकांची मदत हवीशी वाटते. पाठीवर राजकीय वरदहस्त असल्यावर अशा मंडळींची हिंमत वाढते. अगदी मिसरुड न फुटलेली पोरंही कोयते, तलवारी, चाकू घेऊन भररस्त्यात कोणालाही संपविण्याची भाषा करु लागतात. नाशिकमध्ये सध्या तेच सुरु आहे. नाशिकमध्ये गुन्हेगारी दिवसेंदिवस एकेक नवीन टप्पा पार करीत असताना सत्ताधारी पातळीवर सामसूम आहे. सत्ताधारी भाजपचेच दोन माजी नगरसेवक अशा प्रकरणात अडकल्यानेही इतरांना बोलण्यास फारसे काही उरलेले नसल्याची शक्यता आहे.
शहरात सर्वत्र नवरात्रोत्सवाची धू्म सुरु असताना सोळा तासांच्या अवधीत दोन हत्या होणे, हे पोलिसांचे अपयश म्हणावे लागेल. सातपूरच्या श्रमिकनगर परिसरात बुधवारी रात्री कंपनी कामगार जगदीश वानखेडे (२२) या युवकाला अडवून पैशांची मागणी करीत गुंडांनी त्याच्यावर कोयत्याचे वार करुन त्याची हत्या केली.सातपूर पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले. त्यात विधिसंघर्षित मुलांची संख्या अधिक आहे.
या हत्येची चर्चा सुरु असतानाच पाथर्डी फाटा परिसरातील कॅफेत २२ वर्षीय युवकावर टोळक्याने कोयत्याने हल्ला केला. त्याची हत्या करण्यात आली. गुरूवारी दुपारी घडलेल्या या प्रकारानंतर पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले. अंबड आणि सातपूर हा औद्योगिक वसाहतीचा भाग आहे. कंपन्यांमधून रात्री कामगार परत येत असताना किंवा जात असताना चौका-चौकात गुंड टोळ्यांकडून त्यांना अडवून धाक दाखवित लूट केली जाते. अनेक कामगार यास बळी पडले आहेत.
हत्यासत्राबरोबरच वाहनांची तोडफोड, दगडफेक हे प्रकार नाशिकमध्ये कायमचे झाले आहेत. शहर दोन हत्यांनी हादरले असताना बुधवारी राजीवनगरात चार ते पाच वाहनांची तोडफोड करण्यात आली. गुरुवारी त्याच भागातील कानिफनगरात टोळक्याने भररस्त्यात एका विद्यार्थ्याला मारहाण केली. देवळालीत सुरक्षारक्षक कोयत्याने हल्ला करण्यात आला. नाशिककरांसमोर आता हे सर्व केव्हां थांबणार, हा प्रश्न आहे.