नाशिक – गणरायाला निरोप देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर सज्जता झाली असून सामाजिक संस्था, संघटना या प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी सरसावल्या आहेत. जल प्रदूषण रोखण्यासाठी मूर्ती आणि निर्माल्य संकलन करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाचा समारोपही पर्यावरणपूरक होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

नेचर क्लब ऑफ नाशिकतर्फे गंगापूर येथील बालाजी मंदिराजवळील धबधब्याजवळ “निर्माल्यातून फुलाकडे” हा उपक्रम शनिवारी अनंत चतुर्थीच्या दिवशी राबविण्यात येणार आहे. संस्थेच्या उपक्रमाचे हे ३१ वे वर्ष आहे. निर्माल्य नदीपात्रात टाकल्यामुळे जलप्रदूषण होते. अनेक आजारांना त्यामुळे सामोरे जावे लागते. तसेच नदीपात्रातील वनस्पती, मासे यांच्यावर देखील मोठा परिणाम होवून पर्यावरण साखळी बिघडते. त्यामुळे संस्थेतर्फे हा उपक्रम राबविला जातो. निर्माल्य नदीपात्रात न टाकता त्यापासून खत कसे तयार केले जाते. याची माहिती गणेश भक्तांना देण्यात येणार आहे, भक्तांनी निर्माल्य देवून सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा यांनी केले आहे.

जल प्रदूषण रोखण्यासाठी प्रत्येक गणेशोत्सवात प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थी कृती समितीच्या सुविचार मंचच्या वतीने यंदाही देव द्या, देवपण घ्या, हा उपक्रम राबविण्यात येत आहे.प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे तसेच निर्माल्य नदीपात्रात विसर्जित केल्याने गोदावरीत मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. त्यामुळे मूर्ती संकलनासाठी “देव द्या, देवपण घ्या” हा उपक्रम राबविण्यात येतो.

उपक्रमाचे यंदाचे १५ वे वर्ष आहे. गतवर्षी हजारो गणेश मूर्ती नाशिककरांनी या उपक्रमांतर्गत विद्यार्थी कृती समितीकडे सुपूर्द केल्या होत्या. यंदाही शनिवारी चोपडा लॉन्स जवळील गोदापार्क येथे सकाळी नऊ ते तीन या वेळेत कार्यकर्ते मूर्ती स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमांत सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांना आकर्षक गुलाबी रंगाचे टी शर्टस मोफत देण्यात येणार आहेत.

संबंधित ठिकाणी गणरायाची आरती करण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच कृत्रिम हौददेखील तयार करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी ९४२१५६३५५५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. गणेशोत्सवातील १० दिवस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व घरोघरी जाऊन कार्यकर्त्यांकडून जनजागृती करणारे पत्रके घराघरात वाटली आहेत. प्लास्टार ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती नदीपात्रात विसर्जित न करता दान कराव्यात, असे आवाहन केले आहे.

राजीवनगर येथे हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्या कार्यालयाबाहेर मूर्ती संकलन केंद्र करण्यात आले आहे. कृत्रीम हौद तयार करत विधीवत पध्दतीने मूर्ती पूजनानंतर विसर्जन केल्यानंतर मूर्ती दान होईल, अशी माहिती सागर देशमुख यांनी दिली.

शाडू माती संकलन दिंडी

नाशिक येथील निसर्गायन, ग्रंथ तुमच्या दारी आणि काही शैक्षणिक संस्था यांच्या सहकार्याने शाडू माती रक्षक या उपक्रमा अंतर्गत शाडू माती संकलन करण्यात येणार आहे. यासाठी आठ आणि नऊ सप्टेंबर रोजी शहरातील पेठे विद्यालय, उंटवाडी येथील प्राथमिक विद्यालय, सीडीओ मेरी हायस्कुल, एम. एस. कोठारी, सारडा कन्या विद्यामंदिर, कोठारी कन्या शाळा, सागरमल मोदी, पुरूषोत्तम इंग्लिश मीडियम स्कुल, आर.जे.सी. गर्ल्स हायस्कुल यांसह वेगवेगळ्या शाळांमध्ये शाडू मातीच्या मूर्ती पाण्यात विरघळून माती संकलित करण्यात येणार आहे.

१० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता इंदिरानर येथील डे केअर सेंटर शाळेत शाडू माती संकलन दिंडी काढण्यात येणार आहे. जमा झालेली शाडू माती ही मूर्तीकाराला मोफत उपलब्ध करून दिली जाईल. नाशिककरांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.