नाशिक – बिहारला जाणाऱ्या १२५४६ लोकमान्य टिळक टर्मिनस- रक्सौल (बिहार) या धावत्या रेल्वेगाडीतून पडून दोघांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. नाशिकरोड रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली. मृत व जखमींची ओळख पटलेली नाही. तिघेही धावत्या रेल्वेतून पडल्याने ही दुर्घटना घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

दिवाळीमुळे सध्या सर्व रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी आहे. अनेक रेल्वे स्थानके प्रवाशांच्या गर्दीने ओसंडून वहात आहे. याच दरम्यान धावत्या लोकमान्य टिळक टर्मिनस- रक्सौल (बिहार) या विना थांबा गाडीतून पडून ही दुर्घटना घडल्याचे समोर आले. मुंबईहून बिहारकडे निघालेली ही रेल्वे नाशिकरोड रे्ल्वे स्थानकात थांबणार नव्हती. नाशिकरोड रे्वे स्थानकाच्या पुढे भुसावळकडे जाणाऱ्या मार्गावर ढिकलेनगर भागात काही व्यक्ती रुळावर पडल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून नाशिकरोड पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर पोलीस पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधितांना तातडीने रुग्णालयात नेले. यातील दोघांचा मृत्यू झाल्याचै वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णायात उपचार सुरू आहेत.

मृत व जखमींची स्थिती पाहून ते धावत्या रेल्वेतून पडल्याचा अंदाज तपास यंत्रणेने व्यक्त केला. तिघांची अद्याप ओळख पटलेली नाही. जखमी व्यक्ती अद्याप जबाब व घटनेबाबत माहिती देण्याच्या स्थितीत नाही. कुणी साक्षीदार नसल्याने मृत्युचे कारण स्पष्ट झालेले नाही. मयत अनोळखी दोन व्यक्तींचे वय ३० ते ३५ वर्षांच्या दरम्यान आहे. शनिवारी रात्री काही व्यक्ती नाशिक-ओढा मार्गावर रेल्वेसमोर आल्याची माहिती लोकमान्य टिळक टर्मिनस- रक्सौल बिहार) रेल्वेचे लोको पायलट एस. के. देटे यांनी ओढा रेल्वे स्थानकातील रेल्वेचे अधिकारी आकाश भारद्वाज यांना दिली होती. या आधारे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ती माहिती नाशिकरोड पोलिसांना कळवली.

लोको पायलटने काही जण रेल्वेसमोर आल्याचे म्हटले असले तरी तिघेही धावत्या रेल्वेतून पडल्याचा नाशिकरोड पोलिसांचा अंदाज आहे. जखमीचा जबाब व मृत व्यक्तींची ओळख पटल्यानंतर सर्व बाबी स्पष्ट होतील. त्यास नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी दुजोरा दिला. सध्या या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सहा आणि ११ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मुंबईसह आसपासच्या भागातून विधानसभा निवडणुकीसाठी रेल्वेने बिहारला जाणाऱ्यांची मोठी संख्या आहे. उपरोक्त दुर्घटनेतील तीन जण बिहारला निवडणुकीसाठी निघाले होते का, याची स्पष्टता मात्र अद्याप झालेली नाही.