जळगाव – देशात आणि राज्यात सत्तेच्या बळावर विरोधकांना दडपण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. नेपाळसारखी परिस्थितीत भारतातही आहे. शेती मालास भाव नसल्याने सर्वत्र तीव्र असंतोष पसरला आहे. त्यामुळे शेतकरी विरोधी असलेल्या या सरकारला एक दिवस शेतकरीच घरी बसवतील, अशी टीका राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी येथे केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये येत्या सोमवारी आयोजित मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जळगावात गुरूवारी पक्षाचा मेळावा घेण्यात आला. मेळाव्यास उपस्थित प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना शिंदे यांनी केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधारी पक्षांना लक्ष्य केले.
या वेळी शरद पवार गटाचे ज्येष्ठे नेते आमदार एकनाथ खडसे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, माजी खासदार ईश्वर जैन, माजी आमदार संतोष चौधरी, राजीव देशमुख, डॉ. बी.एस.पाटील, जिल्हा निरीक्षक भास्करराव काळे, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, युवक जिल्हाध्यक्ष विश्वजित पाटील, महानगर अध्यक्ष एजाज मलीक, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, महानगर अध्यक्षा मंगला पाटील आदी उपस्थित होते.
जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कापसासह केळीच्या भावाचे तसेच इतरही बरेच प्रश्न आहेत. त्यांना वाचा फोडण्यासाठी शरद पवार गटातर्फे लवकरच भव्य मोर्चा काढण्यात येईल. जो पर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हलायचे नाही, अशी भूमिका पक्षाची असेल. या व्यतिरिक्त सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यासाठी आणखी दुसरे आंदोलन केले जाईल, असे शशिकांत शिंदे यांनी सांगितले.
जळगावसारखी मोठी महापालिका असताना कुठेच चांगले काम दिसत नाही. एखाद्या चौकाचे सुशोभिकरण देखील त्यांच्याने झालेले नाही. जळगावमध्ये फक्त गुंड पोसण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. त्यामुळे बरेच जण बंदूक घेऊन फिरत आहेत. नागरिक निमुटपणे सर्व सहन करत करतात. त्याचाच गैरफायदा घेतला जात असल्याचा आरोप शिंदे यांनी केला.
उमेदवारीचा निर्णय जिल्हास्तरावर
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लढण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी आतापासूनच कामाला लागावे. उमेदवारीचा निर्णय जिल्हास्तरावरच घेतला जाईल. त्यासाठी प्रदेश कार्यालयात येण्याची गरज नाही. तरूणांना शरद पवार गटाकडून निवडणूक लढण्याची मोठी संधी चालून आली आहे. काही जण पक्ष सोडून गेल्याने गाडी रिकामी आहे, असेही प्रदेशाध्यक्ष शिंदे म्हणाले.
पक्ष सोडून गेलेले सर्व लाभार्थी
जळगाव जिल्ह्यातील दोन माजी मंत्री तसेच तीन माजी आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन अजित पवार गटासह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्या विषयी बोलताना जेवढे पक्ष सोडून गेले ते सर्व लाभार्थी होते. सत्तेशिवाय त्यांना चैन पडता नाही. अजून काही जाण्याच्या तयारीत आहेत. मात्र, जे पक्ष सोडून गेले त्यांना सत्ता आल्यानंतर पक्षात घ्यायचे नाही, अशी आपली ठाम भूमिका राहणार आहे. तसेच जे लोक पक्ष सोडून गेले त्यांना एक दिवस पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही, असेही शशिकांत शिंदे यांनी नमूद केले.