रेशन दुकानांचा पुरवठा विस्कळीत; वखार महामंडळ आणि अन्न महामंडळातील वादाचा गरिबांना फटका

मनमाड : केंद्र शासनाच्या अखत्यारीत असलेल्या केंद्रीय वखार महामंडळाने (सीडब्ल्यूसी) नाशिक रोड येथील प्रमुख साठवणूक केंद्रात भारतीय अन्न महामंडळाला (एफसीआय) धान्य साठवणुकीसाठी अडचणी निर्माण केल्याने तेथील गोदाम एफसीआयला रिकामे करावे लागले. त्यामुळे जिल्ह्यांसह लगतच्या रेशनधान्य दुकानांचा धान्यपुरवठा विस्कळीत झाला आहे. डिसेंबर आणि जानेवारीत नाशिक जिल्ह्यातील रेशन दुकानातून वितरित केल्या जाणाऱ्या धान्याचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. तसेच पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचे मोफत धान्यही वेळेवर मिळत नसल्याने लाभधारक अडचणीत सापडले आहेत. परिणामी, त्या त्या महिन्याचे धान्य रेशनकार्डधारकांना त्या महिन्यातच वाटप करण्याचे सूत्र कोलमडून पडले आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून राज्याने मंजूर केलेल्या कोटय़ाप्रमाणे मनमाड येथील एफसीआयला त्या त्या महिन्यांतील धान्याची रक्कम धनाकर्षांद्वारे पाठविली जाते. ज्या महिन्याचे धान्य मंजूर झाले, ते त्याच महिन्यात वाटप करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्यासाठी ई पॉस यंत्र ठेवण्यात आले असून त्यातही तशी नोंद केली जाते.

मनमाडहून नाशिक शहर परिसरातील भाग आणि नाशिक ग्रामीण भागास समसमान ५० टक्के वाहतूकदारांच्या मालमोटारीतून दररोज धान्य वितरण केले जाते. नाशिक भागातील बरेच धान्य नाशिक रोड येथील केंद्र शासनाच्या अखत्यारीतील वखार महामंडळाच्या गोदामात पाठविले जाते. वखार महामंडळाचीही गोदामे अन्न महामंडळाने भाडेतत्त्वावर घेतलेली होती. परंतु, काही महिन्यांपासून तेथे धान्य साठवणुकीस मज्जाव करण्यात आल्याचे सांगितले जाते. गोदामात साठवणूक केलेला धान्यसाठाही काढून घेण्यात येऊन ते रिकामे करून घेण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे. त्यामुळे धान्य साठवणुकीबाबत पेच निर्माण झाला असून वितरणात अनियमितता आली आहे. मनमाड येथील अन्न महामंडळाला जेवढय़ा धान्याची मागणी आणि त्याची पाठविलेली रक्कम मिळते, त्याप्रमाणे दररोज जिल्ह्यांतील विविध भागांत मालमोटारीद्वारे धान्यपुरवठा केला जातो. दररोज ७० ते ८० मालमोटारी येथून नाशिक तसेच ग्रामीण भागासाठी भरल्या जातात. त्यामुळे जिल्ह्यातील धान्य वितरणाबाबत एफसीआयकडून कोणताही अडथळा झालेला नसल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. दरम्यान, अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी हस्तक्षेप केल्यानंतर एफसीआयने गहू आणि तांदळाचा पंजाब, हरियाणा येथून २५०० टनांचा साठा रेल्वे गाडीने तातडीने मागविला आहे.

रेशन दुकानदारांचे साकडे

नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांच्या काळात जिल्ह्यातील धान्य वितरणात नाशिक रोडला साठवणुकीची सोय नसल्याने उशीर होत आहे. याबाबत रेशन दुकानदार संघटनांच्या प्रतिनिधींनी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यानंतर भुजबळ यांनी पुरवठा विभागाच्या सचिवांशी संपर्क साधून धान्यपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले.

तातडीचा उपाय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाशिक परिसरात रेशनचे धान्य घेणारे तसेच पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत ज्यांना धान्य दिले जाते, अशा लाभार्थीसाठी मनमाड एफसीआयने तातडीने ४२ बोग्यांतून २५०० टनांची एक गव्हाची आणि दुसरी तांदळाची गाडी पंजाब आणि हरियाणा येथून मागविली आहे. येत्या तीन दिवसांत साठा नाशिक रोडला पोहचेल. तेथून परस्पर धान्य वितरण होईल. त्यानंतर जिल्ह्यातील रेशनवरील धान्य वितरणात नियमितता येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.