नाशिक : आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पार्श्वभूमीवर, सर्वच राजकीय पक्ष मेळावे, बैठका घेऊ लागले आहेत. विरोधक सत्ताधारी महायुतीवर मोर्चांमधून तुटून पडत आहेत. नाशिकमधील वाढती गुन्हेगारी, रस्त्यांवरील खड्डे, शेतकऱ्यांचे प्रश्न, कृषी उत्पादनांना मिळणारा अत्यल्प भाव, कामगारांच्या समस्या याविषयी मागील महिन्यात सर्वप्रथम मनसे आणि शिवसेनेने (उध्दव ठाकरे) संयुक्त मोर्चा काढला होता. त्यानंतर डाव्या आघाडीच्या वतीनेही याच प्रश्नासंदर्भात मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादीनेही (शरद पवार) नाशिकमध्ये आयोजित पदाधिकारी मेळाव्याचे औचित्य साधून प्रामुख्याने कृषी प्रश्नांविषयी मोर्चा काढला. महाविकास आघाडीतीत शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या दोघांनीही मोर्चे काढले असताना काँग्रेस मात्र मागे राहिली.

नाशिकमधील वाढती गुन्हेगारी हा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय राहिला आहे. गुन्हेगारीकडे सत्ताधाऱ्यांचे होणारे दुर्लक्ष हा विषय विरोधकांना आयताच मिळाला. वाढत्या गुन्हेगारीमुळे बेजार नाशिककरांचा आवाज उठविण्यासाठी मागील महिन्यात मनसे आणि ठाकरे गटाने संयुक्त मोर्चा काढला. या संयुक्त मोर्चातून मनसे-ठाकरे गटाने आपली ताकद दाखवून दिली. महापालिका निवडणूक तयारीच्या दृष्टीनेही या मोर्चाकडे पाहिले गेले. महापालिका निवडणूक नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरे गट एकत्रितपणे लढतील, हा संदेशही या मोर्चातून दिला गेला. या मोर्चानंतर भाकप, माकपसह इतर सहयोगी संघटनांनी गुन्हेगारीसह नाशिककरांच्या इतर प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी मोर्चाचा आधार घेतला.

दरम्यान, नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचा राज्यस्तरीय पदाधिकारी मार्गदर्शन मेळावा झाला. या मेळाव्यात प्रामुख्याने कृषिविषयक प्रश्नांवर भर देण्यात आला. काही महिन्यांपासून कांद्याला अत्यल्प भाव मिळत असल्याने निराश झाल्ला कांदा उत्पादक पुन्हा एकदा शरद पवार गटाकडे वळविण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करण्यात आला. त्यासाठी खास बैलगाडीही मोर्चात सामील करण्यात आली होती. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची उपस्थिती आणि मोर्चात उघड्या जीपमधून सहभाग हे या मोर्चाचे वैशिष्ट्ये ठरले. मोर्चात शेतकऱ्यांची संख्या अधिक होती.

महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि शरद पवार गट हे दोन्ही पक्ष महायुतीविरोधात मोर्चांव्दारे आक्रमक झाले असताना काँग्रेसच्या पातळीवर शांतताच होती. काँग्रेसची उत्तर महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांची बैठक मागील आठवड्यात नाशिक येथे घेण्यात आली. यानिमित्ताने महापालिका निवडणुकीसह जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चा काढण्याची गरज मांडली गेली. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही अनुकूलता दर्शविली. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी, खड्डे, भ्रष्टाचार, शेतीप्रश्न या विषयांवर काँग्रेसचाही लवकरच नाशिकमध्ये मोर्चा निघणार आहे. मोर्चाची तयारी सुरु करण्यात आली असल्याचे काँग्रेस शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी नमूद केले आहे.