नाशिक – मनमाड ते मुंबई पंचवटी एक्स्प्रेसमध्ये मासिक पासधारक (एमएसटी) बोगीत आरामशीर झोपून प्रवास करण्यात येत असताना दुसरीकडे अन्य डब्यांमध्ये गर्दीत तिकीटधारकांना उभे राहून, दरवाजाजवळ बसून प्रवास करावा लागत आहे. पासधारक बोगीत कितीही आसने रिक्त असली तरी तिथे इतरांना प्रवेश नसतो. पासधारकांच्या दादागिरीसमोर रेल्वे प्रशासनही हतबल झाल्याचे चित्र आहे.

मनमाड-नाशिक-मुंबई दरम्यान दररोज धावणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसवर जिल्ह्यातील चाकरमान्यांची मुख्य भिस्त आहे. त्यांच्यासाठी या रेल्वेगाडीत वातानुकूलीत एक आणि सर्वसाधारण दोन अशा एकूण तीन बोगी राखीव आहेत. यामध्ये प्रामुख्याने रविवारची सुट्टी संपल्यानंतर सोमवारी मुंबईला जाताना तसेच शुक्रवारी रात्री मुंबईहून नाशिकला सुट्टीसाठी परतणाऱ्या नोकरदारांची गर्दी असते. दैनंदिन ये-जा करणाऱ्या पासधारकांचे प्रमाण तुलनेत कमी आहे. त्यामुळे हे दोन दिवस वगळता इतर दिवशी या तिन्ही डब्यांत फारशी गर्दी नसते. ३० ते ४० टक्के आसने रिक्त असतात. त्यामुळे काही पासधारक तीन आसनांची जागा व्यापून अक्षरश: झोपून प्रवास करतात. ही बाब या बोगीतील छायाचित्रांवरून उघड झाली.

पंचवटी एक्स्प्रेसमध्ये मुंबईला ये-जा करणारे विद्यार्थी आणि इतर प्रवाशांची संख्या मोठी आहे. जागेअभावी अनेकांना उभे राहून प्रवास करावा लागतो. काही जण दारात बसतात. मासिक पासधारकांच्या डब्यात अनेक आसने रिक्त असूनही त्यांना तिथे प्रवेश मिळत नाही. प्रवेश तर दूर, तेथील दरवाजात साधे उभे राहू दिले जात नसल्याचे प्रवासी सांगतात.

एका प्रवाशाने वातानुकुलीत श्रेणीत आपले तिकीट अद्ययावत करण्याची तयारी दर्शविली होती. पासधारकांनी तपासनीसकावर दबाव टाकून प्रतिबंध केल्याचा काहींचा अनुभव आहे. रेल्वे प्रवाशांना एमएसटी पासधारकांच्या दादागिरीला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार संबंधित प्रवाशाने रेल्वेमंत्र्यांकडे केली होती. त्यावर नेमकी काय कारवाई झाली, हे गुलदस्त्यात आहे. कारण. परिस्थितीत कुठलाच फरक पडलेला नाही. मासिक पासधारकांची संख्या तीन हजाराच्या आसपास सांगितली जाते. मात्र. यातील बहुतेक दैनंदिन प्रवास करीत नाहीत. संबंधितांना महिनाभराचा पास ७०० रुपयांत मिळतो. तर अन्य प्रवाशांना एका बाजूच्या प्रवासासाठी ११० रुपये मोजावे लागतात.

पंचवटी एक्स्प्रेसमधील प्रकाराबाबत आमच्याकडे तक्रार आलेली नाही. सर्वसाधारणपणे पासधारकांची बोगी त्यांच्यासाठीच राखीव असते. तिथे काही जागा रिक्त असतील तर अन्य तिकीटधारकांना फरकाची रक्कम भरून आसन उपलब्ध करता येते, असा नियम आहे. – इति पांडे (विभागीय रेल्वे व्यवस्थापक, भुसावळ)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पासधारकांच्या बोगीत जागा उपलब्ध असेल तर, इतर प्रवाशांना बसू द्यायला काहीच हरकत नाही. पासधारकांच्या सर्वसाधारण ज्या दोन बोगी आहेत, त्यातील एक मनमाड तर दुसरी नाशिकमध्ये उघडते. जागा उपलब्ध असताना इतरांना बसू न देण्याचे प्रकार पुन्हा घडायला नकोत. यासाठी संघटना पासधारकांना आवश्यक त्या सूचना, समज देईल. – किरण बोरसे (उपाध्यक्ष, रेल्वे प्रवासी वेल्फेअर संघटना)