नाशिक : शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा व्हावा, याकरिता शासनाने सौर ऊर्जा निर्मितीसाठी बागलाण तालुक्यात सुमारे ११०० एकर क्षेत्रावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास मान्यता दिली आहे. यामुळे दररोज सुमारे २२ मॅगावॉट विजेची निर्मिती होणार आहे. या प्रकल्पासाठी जमीन मोजण्याच्या कामास सुरुवात झाली आहे.

बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा बारा तास वीज मिळावी, अशी मागणी केली जात होती. याबाबत आमदार दिलीप बोरसे यांनी पाठपुरावा केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सौर ऊर्जा निर्मितीसाठी प्रायोगिक तत्त्वावर नाशिक जिल्ह्याची निवड केली. त्यात पहिल्या टप्प्यात बागलाणची निवड झाली आहे. महसूल विभागाने सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात ३२ गावांमध्ये एकूण ५० ठिकाणी महसूलची सुमारे ११०० एकर जमीन एक रुपये एकर नाममात्र दराने भाडेपट्ट्यावर देण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा >>> कांदा अनुदान विभागणीवर उत्पादक संघटनेचा आक्षेप

हा भाडे पट्टा ३० वर्षांसाठी असणार आहे. सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी महसूल विभागाने ११०० एकर क्षेत्र भाडे कराराने दिले असून जागेची मोजणी सुरू झाली आहे. मोजणी झाल्यानंतर प्रकल्प उभारणीस प्रारंभ होईल .या प्रकल्पामुळे संपूर्ण तालुक्याला शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात येईल, असे महावितरणचे कार्यकारी अभियंता सतीश बोनडे यांनी सांगितले. तालुक्यातील अंतापूर, पठावे, भवाडे, रामतीर, नामपूर, ब्राम्हणगाव, अजमीर सौंदाणे, एकलहरे, नवेगाव, मळगाव, आराई, राजपूरपांडे, नांदिन, राहुड, मुळाणे, भाक्षी आदी गावांना त्याचा लाभ होणार आहे. बागलाण तालुक्यात शेती हा मुख्य व्यवसाय आहे.

हेही वाचा >>> लाच प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षकासह शिपाई जाळ्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संपूर्ण बाजारपेठ शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे वीज, पाणी, रस्ते, शेतमालाला भाव याची व्यवस्था असेल तर शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येतील. परंतु, सुरळीत वीज पुरवठ्याअभावी शेतकऱ्यांना रात्री, पहाटे आपला जीव धोक्यात घालून पिकांना पाणी द्यावे लागते. यासाठी बारा तास वीज मिळावी, अशी जुनी मागणी आहे. सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पामुळे बागलाण विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल. शेतकऱ्यांना दिवसाही वीज मिळू शकेल, असा विश्वास आमदार बोरसे यांनी व्यक्त केला.