नाशिक – येवला, निफाडसह परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक आहेत. लासलगाव येथे कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. परंतु, अनेकदा कांद्याला भाव न मिळाल्याने शेतकरी अडचणीत येतात. त्यामुळे कांद्याला योग्य भाव मिळण्यासाठी येवला तालुक्यातील चिचोंडी औद्योगिक वसाहतीत ५० एकर जागा कांदा प्रक्रिया उद्योगासाठी आरक्षित करण्यात आली असून लवकरच हा प्रकल्प सुरू होईल, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
लासलगाव बाजार समितीच्या नवीन संकेतस्थळाचे मंत्री भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात भुजबळ यांनी मार्गदर्शन केले. बाजार समितीच्या वतीने मंत्री भुजबळ यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी भुजबळ यांनी, लासलगाव ही आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असल्याचे सांगितले. अनेकदा कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित किंमत मिळवून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले. लासलगाव बाजार समितीला शासनाच्या वतीने अ (चार तारांकित) वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. लासलगाव बाजार समिती अंतर्गत असलेल्या सुभाषनगर उपबाजार समितीचा प्रश्न मार्गी लागला असून खानगावनजीक या उपबाजाराच्या जागेविषयी सचिवांशी चर्चा झाली आहे. बाजार समितींच्या विकासासाठी आवश्यक ती मदत शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येईल. लासलगाव विंचूरसह सोळा गाव पाणी पुरवठा योजनेचे नूतनीकरण करण्यात येत आहे. लासलगाव बाह्यवळण रस्ता, लासलगाव- विंचूर- खेडलेझुंगे रस्ता काँक्रिटीकरणासाठी १३२ कोटी रुपये, पिंपळद- येवला ५६० कोटी रुपयांचे चौपदरी रस्ता काँक्रिटीकरणासाठी ५६० कोटी रुपये, लासलगाव बाजारतळाजवळ पाच कोटीचा पूल, लासलगाव उपजिल्हा रुग्णालयासह अनेक कामे मतदारसंघात सुरू आहेत. ही कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी स्थानिक नागरिकांचे सहकार्य तितकेच महत्वाचे असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
यावेळी बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर जगताप, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, राष्ट्रवादीचे (अजित पवार) येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, उपसभापती संदीप दरेकर, संचालक सुवर्णा जगताप, डॉ. श्रीकांत आवारे आदी उपस्थित होते.
नाशिक जिल्ह्यातील कांदा प्रश्न कायमच चर्चेत असतो. सध्या कांद्याला भाव नसल्याने उत्पादक अडचणीत आले आहेत. कांद्यावर प्रक्रिया उद्योग सुरु केल्यास उत्पादकांनाही त्याचा लाभ होऊ शकतो. त्यामुळेच येवला तालुक्यातील चिचोंडी औद्योगिक वसाहतीत कांदा प्रक्रिया उद्योगासाठी जागा आरक्षित करण्यात आली आहे.