नाशिक – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी सोहळा म्हणजे प्रत्येक संघ स्वयंसेवकांसाठी जणू दिवाळीच. संघासाठी आयुष्य वाहून घेतलेले अनेक स्वयंसेवक आहेत. नाशिकमधील धोंडीराज होनप हे त्यापैकीच एक. वय वर्षे अवघे ९१. मूळ पुण्याचे. कामानिमित्त नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे अधिक काळ वासत्व्य. सेवानिवृत्तीनंतर नाशिकमध्ये स्थायिक. संघाचे सक्रिय कार्यकर्ते. संघाशी परिचय झाला तो वयाच्या अवघ्या सहाव्या-सातव्या वर्षी. तोही अपघाताने. तेव्हांपासून संघाच्या विचारांशी गट्टी जमली ती वयाच्या ९१ व्या वर्षापर्यंतही कायम आहे. वयोमानानुसार आरोग्याच्या तक्रारी असल्या तरी सकाळची शाखा चुकवत नाहीत.

सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांच्या निधनाची शाळेत बातमी आली. आणि शाळेला सुट्टी मिळाली. ही व्यक्ती कोण, जिच्यामुळे शाळेला सुट्टी मिळाली, या उत्सुकतेमुळे संघाशी धोंडीराज यांचा परिचय सुरू झाला. खरं तर घरातील संपूर्ण वातावरण संघमय होते. त्यामुळे कळत नकळत संघाचे विचार मनावर रुजत गेले. याशिवाय घरातील आजुबाजुची मंडळीही संघ विचारांची होती. त्यामुळे ते नाही गेले तर परिचयातील मंडळी हाताला धरून त्यांना शाखेत घेऊन जात. गंमत म्हणजे घरात दोन काका होते. तेही पोलीस दलात. हा काळ १९३४ चा. दोन्ही काकाही संघ विचारांचे होते. याविषयीची आठवण धोंडीराज होनप सांगतात. पुणे जिमखाना परिसरात लहान मुलांची शाखा भरायची. त्याच्या बाजूला अळूची बाग होती. त्यामुळे आमच्या शाखेला अळूची खाचरी शाखा अशी ओळख होती, असे त्यांनी सांगितले.

शिक्षण पुर्ण झाल्यानंतर ते ब्रुक ब्रॉण्ड कंपनीमध्ये कामाला लागले. मुंबई येथील रंजना यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना तीन मुलगे झाले. कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी बदली होत असतांना शाखेत जाणे चुकविले नाही. त्यावेळी आणीबाणी जाहीर आली. आणीबाणीत होनप हे तुरूंगातही गेले. ते तुरूंगात असतांना घरातील सदस्यांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागले. पण संघाच्या इतर मंडळींनी होनप यांच्या नोकरीवर गदा येणार नाही, याची काळजी घेतली. ते तुरूंगातुन बाहेर आले. त्यानंतर पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरूवात केली. वेगळी अशी जबाबदारी आली नाही. मात्र नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे आल्यावर त्यांनी नियमित शाखा सुरू केली.

नाशिक येथे वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्यासह राजाभाऊ मोगल आणि अन्य सहकाऱ्यांशी परिचय झाला. राज्यात ठिकठिकाणी बैठकांना जाणे, संघाच्या कार्यक्रमात सहभागी होणे, ही कामे सुरू होती. त्यातून जनसंपर्क वाढत गेला. हा जनसंपर्क आज उतारवयात कामास येत आहे. लातूर येथे भुकंपग्रस्तांना मदतकार्यासाठी संघाचे स्वयंसेवक रवाना झाले. त्यावेळी होनप यांचाही त्यात समावेश होता. तेथील कार्यकर्त्यांनी ही ओळख लक्षात ठेवत नाशिकला आल्यावर पुन्हा एकदा कित्येक वर्षांनी त्यांची भेट घेतली.

डॉ. हेडगेवार यांचा अपवाद वगळता गोळवलकर गुरूजी, बाळासाहेब देवरस यांच्यासह अन्य सरसंघचालकांशी त्यांचा जवळून संपर्क आला. बाळासाहेब नाशिक येथे मुक्कामी असतांना त्यांच्यासाठी होनपकाका थर्मासमध्ये चहा घेऊन जात होते, त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांच्याबरोबर राहण्याचा योग आल्याचे होनप सांगतात. संघाच्या विचार प्रणालीत कालानुसार बदल होत आहेत. पाया तोच असला तरी बदल अनिवार्य.

संघाचा गणवेश बदलला. मागील वर्षापर्यंत संघाच्या संचलनात सहभाग होता. परंतु, काही महिन्यांपासून चालणे जड जात असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच जमेल ते काम करत आहे. यामुळे घरातच प्रभात शाखा भरवत, संघ प्रार्थना, योगासने, व्यायाम करत होनप काका नियमित कामाला सुरूवात करतात. यंदा विजयादशमीनिमित्त निघालेल्या संघाच्या संचलनात सहभागी होता आले नाही, याची खंत त्यांच्या चेहऱ्यावर दिसली.