नाशिक : ओव्हरहेड वायर तुटल्याने मुंबई-भुसावळ दरम्यानची रेल्वे वाहतूक रविवारी पहाटे दोन वाजेपासून बंद होती. यामुळे मुंबईहून भुसावळकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रखडल्या. काही गाड्यांचे मार्ग बदलावे लागले. देवळाली-भुसावळ मेमू एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. दुपारी दुरुस्तीचे काम झाल्यानंतर मुंबई-भुसावळ मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्ववत झाली. यामुळे प्रवाशांचे हाल झाले.
रात्री मुंबई-हैद्राबाद देवगिरी एक्स्प्रेस मार्गस्थ झाल्यानंतर देवळाली – नाशिकरोड रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटली. यामुळे मुंबईहून भुसावळकडे जाणारी रेल्वे वाहतूक पूर्णत: ठप्प झाली. मुंबईहून मार्गस्थ झालेल्या तीन गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी थांबवून ठेवण्यात आल्या. ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. रात्री भुसावळकडून मुंबईकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे त्या मार्गाचा रविवारी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत वापर (एकेरी वाहतूक) अडकलेल्या रेल्वेगाड्यांसाठी करता आला नाही. मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या गेल्यानंतर नाशिक किंवा भुसावळकडे जाणाऱ्या केवळ तीन गाड्या या मार्गावरून सोडण्यात आल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. यात शालिमार एक्स्प्रेस, हावडा आणि मुंबई-बनारस साकेत एक्स्प्रेस या रेल्वेगाड्यांचा समावेश होता.
भुसावळ मार्गावरील कल्याण आणि मनमाड दरम्यानची रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे मुंबईहून निघालेल्या काही रेल्वेगाड्या दौंड-मनमाड मार्गाने तर काही वसई रोड, सुरतमार्गे जळगावकडे वळविण्यात आल्या. काही रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले. त्यांना मुंबईहून चार ते पाच तास उशिराने सोडण्यात आले. ओव्हरहेड वायर तुटल्याचा फटका रेल्वे प्रवाशांना बसला. लांब पल्ल्याच्या तीन गाड्या किमान चार ते पाच तास अडकून पडल्या. देवळाली-भुसावळ मेमू एक्स्प्रेस रद्द झाल्यामुळे रविवारी प्रवासाचे नियोजन करणाऱ्यांना माघारी परतावे लागले. दुपारी बारानंतर मुंबई-नाशिक-भुसावळ रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत झाल्यानंतर हळूहळू वाहतूक पूर्ववत झाली.
कोणत्या रेल्वेगाड्यांवर परिणाम ?
ओव्हरहेड वायर तुटल्याचा फटका अनेक रेल्वेगाड्यांना बसला. ११११३ देवळाली-भुसावळ मेमू एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. तर २०१०३ मुंबई-गोरखपूर एक्स्प्रेस, १२८५९ मुंबई-हावडा गितांजली एक्स्प्रेस, २२१२९ लोकमान्य टिळक टर्मिनस-अयोध्या कॅन्ट तुलसी एक्स्प्रेस, २२२२३ मुंबई सीएमएसटी-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस वेगवेगळ्या मार्गाने वळविण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. काही रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बदलावे लागले. १७६१७ मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस आणि १५०१७ लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर काशी एक्स्प्रेस यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याचे रेल्वेने म्हटले आहे.