नाशिक : शेवगा पावडर खरेदी-विक्री व्यवहारात गुजरातमधील दोन ठगांनी स्थानिक व्यावसायिकाला ८७ लाखांना फसविल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी गुजरातमधील दोन संशयितांविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हर्षल ठाकरे (बलरामनगर, नाशिक) या व्यावसायिकाने तक्रार दिली. मनोज पटेल आणि अनिल पटेल (भूज, गुजरात) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. ठाकरे यांचा हरबक्स कृषी उत्पादन आणि निर्यातीचा व्यवसाय आहे. गंगापूर नाका येथील सिद्धीपूजा इमारतीत त्यांचे कार्यालय आहे. या कार्यालयात येऊन संशयितांनी एम. पटेल नामक कंपनीच्या नावे दोन वेळा शेवगा पावडर खरेदी केली होती. ही खरेदी रोखीने करून संशयितांनी ठाकरे यांचा विश्वास संपादन केला. नंतर शेवगा पावडर निर्यात करायची असल्याचे सांगून संशयितांनी घाऊक खरेदीचे आमिष दाखवले. पाच ऑगस्ट २०२४ रोजी पटेल बंधूनी ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पाच लाख रुपये आगाऊ देत सहा हजार ४४० किलो वजनाच्या आणि सुमारे ९२ लाख दोन हजार ७६० रुपयांच्या पावडरची मागणी नोंदविली. उर्वरीत रक्कम लवकर देण्याचे आश्वासन दिल्याने ठाकरे यांनी गोदामातून माल पाठवून दिला. आठ – नऊ महिने उलटूनही पैसे न मिळाल्याने ठाकरे यांनी पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विहितगावात टोळक्याचा धुडगूस

हप्ता न दिल्याच्या रागातून टोळक्याने घराच्या काचा फोडून परिसरात धुडगूस घातल्याची घटना विहितगाव येथे घडली. यावेळी टोळक्याने कोयत्याने दरवाजा आणि प्लास्टिकचे पिंप फोडले. याबाबत अशोक बागूल (६१, बागूलनगर, विहितगाव) यांनी तक्रार दिली. राहुल उर्फ भांड्या तेलोरे (बागूलनगर, विहितगाव), अनिकेत उर्फ केरला राजू जॉन (सुभाषरोड, नाशिकरोड), समीर शेख (विजयनगर, जयभवानीरोड) आणि यश दंडगव्हाळ (जेलरोड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. वाहनचालक असणाऱ्या बागूल यांच्याकडे मागील महिन्यात संशयितांनी हप्ता मागितला होता. त्यांनी तो दिला नाही. या रागातून दुचाकीवर आलेल्या संशयितांनी सोमवारी मध्यरात्री बागूलनगर भागात धुडगूस घातला. परिसरात दहशत माजवली. टोळक्याने कोयत्याने बागूल यांच्या घराच्या खिडकीच्या काचा फोडल्या. दरवाजावर कोयता मारला. घराबाहेरील पाण्याचे पिंप फोडून नुकसान केले. या घटनाक्रमाने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंटेनरच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू

नाशिक-पुणे महामार्गावरील दत्त मंदिर चौकात कंटेनरची धडक बसल्याने झालेल्या अपघातात ५६ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. सतीश जाधव असे अपघातात मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. जाधव शुक्रवारी दुचाकीवर सिन्नर फाट्याकडून नाशिककडे येत होते. दत्त मंदिर चौक परिसरात कंटेनरने दुचाकीस धडक दिली. अपघातानंतर चालक कंटेनरसह पळून गेला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या जाधव यांचा मृत्यू झाला. याबाबत मुलगी कविता सुर्वे (नारायणबापू नगर, नाशिकरोड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून उपनगर पोलीस ठाण्यात पसार झालेल्या कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.