धुळे : शहराच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार्या रिंग रोडचे काम कधी सुरु होणार, याकडे संपूर्ण धुळेकरांचे लक्ष लागले असताना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली.

भारतीय जनता पक्षाचे धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, रावेरचे आमदार अमोल जावळे, भाजपचे महानगर जिल्हा सरचिटणीस ओमप्रकाश खंडेलवाल यांनी नागपूर येथे केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेतली. त्यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांनी धुळ्यातील प्रलंबित रिंग रोडसह विविध विकास कामांच्या पूर्ततेची मागणी करत निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली. धुळे शहर भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे असून, शहरातून तसेच शहराला लागून सहा राष्ट्रीय महामार्ग जातात.

याशिवाय धुळे शहरातील वाढते उद्योग, व्यवसाय तसेच मोठ्या बाजारपेठेमुळे शहरात येणार्या वाहनांच्या मोठ्या संख्येमुळे शहालगतच्या रस्त्यांवर वाहतुकीचा प्रचंड ताण वाढत आहे. परिणामी नागरिकांसह वाहनधारकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग, नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्ग, धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग तसेच मालेगाव-कुसुंबा-दोंडाईचा या राष्ट्रीय महामार्गांना जोडण्यासाठी शहराबाहेरून रिंग रोडची आवश्यकता आहे.

याबाबत केंद्र शासनाच्या भारतमाला योजनेंतर्गत या रिंग रोडसाठी आपणाकडे पत्र दिले असल्याची आठवणही आमदार अग्रवाल यांनी गडकरी यांना करुन दिली. आता लवकरात लवकर या रिंग रोडसाठी निविदा प्रक्रिया राबवावी, अशी मागणी आमदार अग्रवाल यांनी केली. आमदार अग्रवाल यांनी धुळे शहरातील विविध विकास कामांच्या पूर्ततेसाठी केंद्रीय रस्ते निधीतून तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचीही मागणी मंत्री गडकरी यांच्याकडे केली.

यामध्ये शहरातील जुन्या आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते महात्मा गांधी पुतळा, संतोषीमाता चौक ते दसरा मैदान, नकाणे रोड-शारदा नेत्रालय, नेताजी ग्राउंड ते वाडीभोकर रोड, फरशी पूल चौक ते बारा पत्थर, संतोषी माता चौक ते सिद्धिविनायक गणपती मंदिर-स्वामी समर्थ केंद्र ते कानुश्री मंगल कार्यालय या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे, पांझरा नदीकिनारी कालिकादेवी मंदिर ते जयहिंद तरणतलावापर्यंत नवीन पूल उभारणे, ज्योती चित्रपटगृह ते स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्यापर्यंत नवीन पूल बंधारा बांधणे, अवधान एमआयडीसीतील डिसान कंपनी ते हॉटेल रेसिडेन्सी पार्कपर्यंत मुंबई-आग्रा महामार्गाच्या दोन्ही बाजूस सर्व्हिस रोड तयार करणे, रानमळा-अवधान-चितोड-मोराणे-गोंदूर-नगाव असा १८ किलोमीटरचा चौपदरी काँक्रिट रोड करणे, पारोळा रोड चौफुली ते फागण्यापुढील अमळनेर चौफुलीपर्यंत चौपदरी रस्ता करणे आदी कामांसाठी केंद्रीय रस्ते निधीसह अन्य फंडांतून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार अग्रवाल यांनी केली.

आमदार अग्रवाल यांच्या मागणीवर मंत्री गडकरी यांनी, धुळे शहराबाहेरून जाणार्या रिंग रोडसाठी  लवकरात लवकर निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल. तशा सूचना संबंधित विभागाला दिल्या असल्याचे सांगितल्याची माहिती आमदार अग्रवाल यांनी दिली.