नाशिक : शहरातील गंगापूर रस्त्यावरील आकाशवाणी केंद्र परिसरात महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून अन्यायकारक कारवाई होत असल्याची तक्रार करुन विक्रेत्यांनी पालिकेच्या राजीव गांधी भवनच्या प्रवेशद्वारासमोर भाजीपाला फेकत निषेध केला. आकाशवाणी केंद्रासह शहरातील सर्व भागात फेरीवाला क्षेत्रात छोट्या विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून द्यावी, तोपर्यंत आहे तिथे व्यवसाय करू द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

नवसंघर्ष संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आकाशवाणी परिसरात महापालिकेने भाजीपाला बाजाराची उभारणी केली आहे. या ठिकाणी रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्या काही विक्रेत्यांना मनपा बाजारात जागा मिळाली. परंतु, अनेक विक्रेत्यांना ती मिळाली नाही. संबंधितांकडून रस्त्यालगत दुकाने थाटली जातात. संबंधितांविरोधात अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कारवाईचे सत्र सुरू झाल्यामुळे विक्रेत्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. शुक्रवारी विक्रेत्यांनी भाजीपाला मनपाच्या प्रवेशद्वारासमोर फेकून ठिय्या दिला. कारवाई विरोधात घोषणाबाजी केली.

हेही वाचा…नाशिक : बाजार समित्यांमध्ये उत्तर भारतातील व्यापाऱ्यांना परवाने देण्याचा विचार

संपूर्ण राज्यात दुष्काळ आहे. या स्थितीत शेतकरी व शेतमाल विकणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांवर मनपाकडून होणारी कारवाई तत्काळ थांबवावी, अशी मागणी आंदोलकांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे. आकाशवाणी केंद्र, शिवाजीनगर, सातपूर, पंचवटी, नाशिकरोड, सिडको या ठिकाणी भाजीपाला विक्रेत्यांना हक्काचा व्यवसाय करण्यासाठी फेरीवाला क्षेत्राची जागा उपलब्ध करावी. ही जागा जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत भाजी विक्रेत्यांना आहे त्या ठिकाणी व्यवसाय करू द्यावा, अशी मागणी करण्यात आली. अनेक वर्षांपासून आकाशवाणी परिसरात भाजीपाला व्यवसाय सुरू आहे. अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी विक्रेत्यांकडून हप्ते घेतात, असा आरोप यावेळी करण्यात आला. या विभागाची हप्तेखोरी बंद करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.