जळगाव – जामनेरमध्ये भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी यंदा सातव्यांदा विजय मिळवला असला, तरी त्यांच्या विरोधातील उमेदवार दिलीप खोडपे यांनी एक लाखांवर मते मिळवली होती. या पार्श्वभूमीवर, जामनेरमध्ये चांगली ताकद असतानाही शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव नेमका कशामुळे झाला, त्याबाबतचा गौप्यस्फोट माजी खासदार ईश्वर जैन यांनी येथे गुरूवारी केला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये येत्या सोमवारी आयोजित मोर्चाच्या अनुषंगाने जळगावात गुरूवारी शरद पवार गटाचा मेळावा घेण्यात आला. त्या ठिकाणी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना राज्यसभेचे माजी खासदार ईश्वर जैन यांनी मार्गदर्शन करताना महायुतीच्या सरकारवर टीका करण्याची संधी साधली. तसेच पक्ष संघटन वाढीसाठी प्रत्येकाने जबाबजारीने वागण्याचे आवाहन केले.

विधानसभेच्या निवडणुकीत पदाधिकारी व कार्यकर्ते ऐनवेळी कमी पडल्याने शरद पवार गटाच्या जिल्ह्यातील सर्व उमेदवारांचा पराभव झाल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. यावेळी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे, पक्ष निरीक्षक भास्करराव काळे आदी उपस्थित होते.

राज्यातील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मोठी मजल मारली असताना, शरद पवार गटाने १० पैकी तब्बल आठ जागा जिंकून दमदार कामगिरी केली होती. मात्र, या मोठ्या विजयानंतरही साताऱ्यात राष्ट्रवादीचा परंपरागत बालेकिल्ला ढासळला. शशिकांत शिंदे यांचा महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी पराभव केला. तो धक्का शरद पवारांसाठी खूपच वेदनादायी ठरला. शिंदे यांच्या पराभवामागे विविध कारणांची चर्चा झाली; त्यात प्रचारादरम्यान उठलेल्या तुतारी आणि पिपाणीच्या गोंधळालाही मोठ्या प्रमाणात जबाबदार धरले गेले.

पक्षाकडून निवडणूक आयोगाला चिन्ह बदलण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, निवडणूक आयोगाने ती मागणी फेटाळून लावली. प्रत्यक्षात, ३२ हजार ७७१ मतांनी शिंदेंचा पराभव होऊन पिपाणीवर लढलेल्या अपक्ष उमेदवाराला तब्बल ३७ हजार ६२ मते मिळाली. यानुसार, जामनेरमधील शरद पवार गटाच्या उमेदवाराला देखील निवडणुकीत पिपाणीमुळे फटका बसल्याचे माजी खासदार जैन म्हणाले.

जामनेरमधील विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे (शरद पवार) उमेदवार दिलीप खोडपे यांचा फक्त २६ हजार ८८५ मतांनी पराभव झाला. दुसरीकडे, शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हाशी सारखेपणा राखणाऱ्या पिपाणी चिन्हावर निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराने जवळपास १८ हजार मते घेतली. याशिवाय, बाहेरगावांहून अनेक गाड्या भरून लोक मतदान करण्यासाठी आले. गाड्यांमधून आलेले लोक जामनेर तालुक्यात राहतात, हे आम्हाला सुद्धा माहिती नाही. आम्ही झोपेत होतो. शेवटी आम्हाला तिथे हार पत्करावी लागली. या प्रकारापासून फक्त जामनेरकरांनीच नाही तर पक्षाच्या सर्व लोकांनी धडा घेतला पाहिजे, असे आवाहन माजी खासदार जैन यांनी शरद पवार गटाच्या मेळाव्यात केले.