९वी ते १२वीचे वर्ग सुरू होणार; २८ ते ३० डिसेंबपर्यंत शिक्षकांच्या करोना चाचण्या

नवी मुंबई : गेल्या महिन्यात करोना रुग्णांत वाढ झाल्याने पालिका प्रशासनाने महापालिका हद्दीतील शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलला होता. आता नवीन वर्षांत ९वी ते १२वीचे वर्ग सुरू करण्याची पालिका तयारी करीत आहे. यासाठी २८ ते ३० डिसेंबपर्यंत शिक्षकांच्या करोना चाचण्या करण्यात येणार आहेत.

मागील महिन्यात २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याबाबत शासनाने निर्णय घेत त्याची अंमलबजावणी स्थानिक प्रशासनावर सोपवली होती. तेथील करोना परिस्थिती पाहून हा निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र दिवाळीनंतर शहरात करोना रुग्णांत मोठी वाढ झाली होती. तसेच करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता पाहाता हा निर्णय पालिका प्रशासनाने पुढे ढकलला होता. आता शहरातील करोना परिस्थिती नियंत्रणात आली असल्याने शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शहरात ३१ डिसेंबपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानंतर शासनाचे आदेश प्राप्त होताच नवीन वर्षांत शाळा सुरू करण्यात येतील असे पालिकेच्या शिक्षण विभागाने सांगितले आहे.

पालिका क्षेत्रात असलेल्या १७ माध्यमिक शाळांच्या शिक्षकांना विद्यार्थ्यांची आरोग्यविषयक कशी खबरदारी घ्यायची याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तसेच शिक्षकांच्या २८ ते ३० या तीन दिवसांत करोना चाचण्या करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा शाळांचे र्निजतुकीकरण करण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत ५० टक्के हजेरीनुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शाळेत उपस्थित राहात असून विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. शहरातील महापालिका तसेच अनुदानित, विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या करोना चाचण्या करण्यासाठी ३० ठिकाणी व्यवस्था केली होती. त्याप्रमाणेच पुन्हा करोना चाचण्या सुरू करण्यात येणार आहेत.

४५ हजारांहून अधिक विद्यार्थी

नवी मुंबई महापालिकेत प्राथमिक व माध्यमिक विभागात मिळून ४५ हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून पालिकेच्या १८ माध्यमिक शाळांमध्ये ५ हजार ५००हून अधिक विद्यार्थी आहेत. तर  खासगी शाळांमध्ये जवळजवळ २४ हजारांपर्यंत ९वी ते १२वीचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्वच शाळा ३१ डिसेंबपर्यंत बंद राहणार आहेत. त्यानंतर शाळा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. शिक्षकांना आरोग्यविषयक प्रशिक्षण दिले जात असून पुढील आठवडय़ात तीन दिवस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या करोना चाचण्या करण्यात येणार आहेत.

– योगेश कडुस्कर, शिक्षणाधिकारी