सेंट्रल पार्कशेजारील मोकळ्या जागेत कचऱ्याच्या गाडय़ा रित्या

पनवेल : सिडकोने उभारलेल्या खारघर वसाहतीला ‘स्मार्ट सिटी’चा दर्जा आहे. परंतु, पनवेल महानगरपालिकेने या नियोजित शहरात एक ‘तात्पुरती कचराभूमी’ तयार केली आहे. पनवेल पालिका हद्दीसाठी सिडकोच्या घोट गावाशेजारील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात कचरा पावसाळ्यात नेणे शक्य नसल्याने खारघरमधील प्रसिद्ध ‘सेंट्रल पार्क’ उद्यानाशेजारील मोकळ्या जागेत कचऱ्याच्या गाडय़ांवर गाडय़ा रित्या केल्या जात आहेत.

मुसळधार पावसामुळे घोट येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. रस्ता दुरुस्तीची कामे चालू आहेत. ती पूर्ण होईस्तोवर पालिका हद्दीतील कचरा सेंट्रल पार्कशेजारीच टाकला जाईल, असे पालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे.

पावसाच्या पाण्यात हा कचरा सध्या कुजू लागल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरल्याने पनवेल महानगरपालिकेच्या कारभारावर रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

दिवसाला दीडशे टनांपेक्षा अधिक कचरा विविध वसाहतींमधून एकत्र करून घोट गावाशेजारील सिडको मंडळाच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रकल्पात टाकला जातो. परंतु पनवेल पालिकेने सिडको मंडळाकडून घनकचरा संकलन, वाहतूक व शहर सफाईची सेवा हस्तांतरण केल्यापासून विविध वसाहतींमध्ये कचरा एकत्र करण्याचे आगार उभे करण्याच्या जागा निश्चित केल्या आहेत. खारघर येथील सेंट्रल पार्कच्या मागील मोकळ्या जागेत तर नवीन पनवेल येथील शबरी हॉटेलच्या मागील वाहनतळावर वसाहतींचा कचरा एकत्र करून काही दिवस तेथे ठेवायचा आणि त्यानंतर साचलेला कचरा घोट येथील घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रकल्पापर्यंत पोहोचवायचा.

यामुळे येथील नागरिकांना नाक मुठीत घेऊन या परिसरात वावरावे लागत आहे.

खारघर येथील मोकळ्या जागेवर कचरा साचविल्याने येथून रोज सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. याविषयी पनवेल पालिकेकडे नागरिकांनी अनेकदा तक्ररी केल्या आहेत. तरीही कचरा वसाहतीमध्ये साचविण्याचे कार्य पालिकेने सुरूच ठेवल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.