उरण मधील सिडकोच्या द्रोणागिरी नोड मधील एपीएम या डेन्मार्क मधील आंतरराष्ट्रीय कंपनीचे गोदाम असून हे गोदाम गुरूवारी बंद करण्याचा निर्णय येथील गोदाम व्यवस्थापनाने घेतला आहे. त्यामुळे गोदामात काम करणाऱ्या स्थानिक ५०० कामगारांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या गोदामातील ९९ कामगारांना फेब्रुवारीत कमी करण्यात आले होते. या कामगारांचे आंदोलन सुरू असतांना कामावरून कमी करण्यात आलेल्या कामगारांनी वाहनांवर हल्ला केला होता. यात एकूण २२ कामगारांना अटकही करण्यात आलेली होती.

जेएनपीटी बंदरात एपीएम चे जीटीआय हे अत्याधुनिक असे बंदर आहे. या बंदरावर आधारीत तीन गोदाम उरण व पनवेलमध्ये आहेत. त्यातील द्रोणागिरीत ओल्ड व न्यू मर्क्‍स अशी दोन गोदाम आहेत. गोदामातील डीपीडी धोरणामुळे कामावर परिणाम झाल्याने कामगार कमी केल्याचे कारण पुढे करीत कंत्राटी पद्धतीने असलेल्या ९९ कामगारांना व्यवस्थापनाने कमी केले होते. कामगारांचे प्रतिनिधी तसेच व्यवस्थापन यांच्यात कमी केलेल्या कामगारांना कामावर घेण्यासाठी चर्चा व्हावी यासाठी केंद्रीय नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांच्या पर्यंत विषय गेला होता. मात्र याच दरम्यान कामगारांना कामगारांकडूनच मारहाण झाल्याने वातावरण तंग झालेले होते.त्यामुळे व्यवस्थापनाने ओरीएंट फ्रेट सव्‍‌र्हिस या कंत्राटदाराकडे कामे बंद करून गोदामातील काम बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे पत्र एपीएम टर्मिनलचे व्यवस्थापक अजित व्यंकटरमण यांनी काढले आहे.  त्यामुळे एपीएम गोदामातील कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे.