News Flash

कारवाईनंतर मॉलला उपरती

मॉलने ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यास सुरुवात केली

मॉलने ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यास सुरुवात केली असून आवारात १५० किलो ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असलेला प्लांट बसवला आहे.

रघुलीला मॉलमध्ये कचरा विघटनास सुरुवात 

कचऱ्याचे वर्गीकरण न करता तो उघडय़ावर टाकणाऱ्या रघुलीला मॉलचा कचरा पालिकेने मॉलच्याच दारात आणून टाकल्यानंतर मॉल व्यवस्थापनाला उपरती झाली आहे. मॉलने ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यास सुरुवात केली असून आवारात १५० किलो ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असलेला प्लांट बसवला आहे. त्यामुळे आता मॉलमधील सुका कचराच पालिका उचलणार आहे.

नवी मुंबई पालिकेने कचरा निर्मितीच्या जागीच त्याचे वर्गीकरण करणे आणि ज्या निवासी, व्यापारी संकुलांत किंवा आस्थापनांत रोज १०० किलोपेक्षा अधिक कचरा गोळा होतो तिथेच त्याचे सेंद्रिय अथवा जैविक पद्धतीने विघटन करणे अनिवार्य केले आहे. कचरा वर्गीकरण न करणाऱ्या सोसायटय़ांवर कचरा न उचलण्याची कारवाईही पालिकेने केली होती. असे असताना शहरातील काही मॉलचा कचरा मात्र उघडय़ावर टाकण्यात येत होता. वाशी येथील रघुलीला मॉलचा कचरा उघडय़ावर टाकण्यात येत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे सोसायटय़ांवर कारवाई करत असलेली पालिका मॉलच्या नियमभंगाकडे मात्र दुर्लक्ष करत असल्याची टीका होत होती.

या पाश्र्वभूमीवर पालिकेने मॉलचा कचरा त्यांच्याच दारात टाकला आणि मॉलमधील कर्मचाऱ्यांना त्याचे वर्गीकरण करण्यास भाग पाडले. त्यासंदर्भातील वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केले होते. पालिकेने मॉलचा फक्त सुका कचराच उचलण्याचा निर्णय घेतला आहे. मॉल व्यवस्थापनानेही आता ओल्या कचऱ्याचे कंपोस्टिंग करण्यास सुरुवात केली आहे. शहरात १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण होणाऱ्या ६० सोसायटय़ा आणि २२ हॉटेल आहेत.

रघुलीला मॉल व्यवस्थापनाने मॉलमधील १५० किलो ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असलेला प्लान्ट बसवला आहे. त्यामुळे आता मॉलमधील सुका कचराच पालिकेकडून उचलण्यात येईल. मॉलसमोरील कचरा मॉलमधील नाही. आम्ही उघडय़ावर कचरा टाकत नाही.

– संदीप देशमुख, व्यवस्थापन विभाग, रघुलीला मॉल

१०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण होणाऱ्या सोसायटय़ा, हॉटेलांना आवारात कंपोस्टिंग करण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. रघुलीला मॉललाही नोटीस पाठवली होती. त्यांनीही आता ओल्या कचऱ्याच्या कंपोस्टिंगची व्यवस्था केली आहे.

– तुषार पवार, उपायुक्त, घनकचरा विभाग, नमुंमपा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 13, 2017 1:53 am

Web Title: garbage disposal at raghuilla mall
Next Stories
1 पार्किंग रोखण्यासाठी लोखंडी कुंपण
2 ओखी वादळामुळे मासळीची आवक घटली
3 उरणमधील खोपटा पुलाच्या हादऱ्यांत वाढ
Just Now!
X